शिंदे गटात सहभागी झाल्याने तानाजी सावंत यांचे कार्यालय फोडले

पुण्यात शिवसैनिक आक्रमक झालेत आहेत. भैरवनाथ शुगर लिमिटेडच्या कार्यालयात तोडफोड करण्यात आली आहे. बालाजी नगरमधली ही घटना आहे. तानाजी सावंत शिंदे गटात सहभागी झाल्याने तोडफोडीतून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. सकाळी अकराच्या दरम्यान पंचवीस ते तीस शिवसैनिकांनी ज्या ठिकाणी येऊन मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. कार्यालयातील काचा तसेच साहित्य शिवसैनिकांनी फोडले. त्याप्रमाणे बाहेरच्या बाजूला असलेल्या फलकावर काळया शाईने गद्दार सावंत, असे लिहिले.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेनेच्या 38 आमदारांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले आहे. त्यामुळे शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे अशी स्थिती सध्या पाहायला मिळत आहे. बंडामुळे आता शिवसेनेचे कार्यकर्तेही एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज झाले आहेत. दरम्यान, तानाजी सावंत भूम परांड्याचे आमदार शिंदे गटात सहभागी झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे आमदार तानाजी सावंत यांच्या साखर कारखान्यात तोडफोड करण्यात आली आहे.
राज्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर राज्यभरात शिवसेना आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. अनेक शिवसैनिकांकडून आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची काही शिवसैनिकांनी तोडफोड केली. यानंतर तानाजी सावंत यांच्या कात्रज इथल्या मुख्य कार्यालय आणि घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.