नितेश राणेंची पुन्हा मुंबई हायकोर्टात धाव, नियमित जामिनासाठी अर्ज

शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणात सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. राणे यांनी वकिलांमार्फत मुंबई हायकोर्टामध्ये जामीन अर्ज केला आहे. मुंबई हायकोर्टात धाव घेण्याची राणे यांची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती.
संतोष परब हल्ला प्रकरणात सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने मंगळवारी भाजप आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला. सत्र न्यायालयाच्या निर्णयानंतर पोलिसांनी कोर्टाबाहेर नितेश राणे यांचे वाहन अडवल्याचे बोलले जाते. त्यामुळे नितेश यांचे बंधू निलेश राणे संतप्त झाले होते. त्यांनी संबंधित पोलिसांना जाब विचारायला सुरुवात केली. सुप्रीम कोर्टाने १० दिवस अटकेपासून संरक्षण दिले असताना, पोलीस आमचे वाहन अडवू कसे शकतात, असा सवाल निलेश यांनी केला. त्यावेळी राणे यांचे समर्थकही आक्रमक झाले होते. दरम्यान, सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने यापूर्वीही नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.
कोर्टाबाहेर काय घडलं होतं नेमकं?
संतोष परब हल्ला प्रकरणात सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर काही वेळ हायव्होल्टेज ड्रामा रंगला. सुप्रीम कोर्टाने अटकेपासून १० दिवसांचे संरक्षण देऊनही पोलिसांनी नितेश राणे (Nitesh Rane) यांची गाडी अडवल्याने राणे समर्थक आक्रमक झाले होते. नितेश यांचे बंधू निलेश राणे हे देखील पोलिसांवर प्रचंड संतापले. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अवमान करत असून, कोणाच्या आदेशावरून तुम्ही नितेश राणे यांना अडवत आहेत, असा प्रश्न त्यांनी पोलिसांना विचारला.