Red Soil Stories चे यूट्यूबर शिरीष गवस यांचं निधन; 33 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

कोकणची खाद्यसंस्कृती घराघरात पोहोचवणारे युट्यूबर शिरीष गवस यांचं शुक्रवारी निधन झा्लंय. वयाच्या 33 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिरीष गवस यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना आणि कलाक्षेत्रातील दिग्गजांना एकच धक्का बसला आहे. शिरीष गवस यांच्या पश्चात्त एक वर्षांची मुलगी आणि पत्नी आहे.
शिरीष गवस यांना ब्रेन हॅमरेज झाल्याची माहिती समोर येतेय. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर गोव्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. वर्षाभरापूर्वीच त्यांना मुलगी झाली होती. शिरीष यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आज सकाळी 11 वाजता दोडामार्ग तालुक्यातील सासोली पाट्ये पुनर्वसन परिसरात अत्यंसंस्कार करण्यात आले.
शिरीष यांचे रेड सॉइल स्टोरीज नावाचे युट्यूब चॅनेल आहे. त्यांची पत्नी पूजा हिच्या सहाय्याने ते या चॅनलच्या माध्यमातून कोकणची खाद्यसंस्कृती जगभरात पोहोचवण्याचे काम केले. पारंपारिक कोकणी खाद्यपदार्थ, स्थानिक सण-उत्सव हे त्यांनी लोकापर्यंत पोहोचवले. मातीच्या भांड्यात व चुलीवर शिजवलेले जेवण यामुळं जुन्या काळातील वारसा त्यांनी पुन्हा जगासमोर आणला होता.
पूजा आणि शिरीष दोघंही मुंबईत वास्तव्यास होते. करोना काळात दोघेही कोकणातील गावी स्थायिक झाले. शिरीष मुंबईत सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत होते. कोकणात आल्यावर त्यांनी स्वतःचं काहीतरी सुरू करायचे ठरवले होते. त्यानुसार त्यांनी स्वतःचं युट्यूब चॅनेल सुरू केले. रेड सॉइल स्टोरीज असं नाव दिलं. अल्पावधीतच त्यांचे हे चॅनेल लोकप्रिय झाले. त्यांच्या रेसिपीजही लोकांना आवडू लागल्या. इतकंच नव्हे तर मोठमोठ्या सेलिब्रिटीदेखील त्यांच्या या चॅनलवर येऊ लागले होते.
शिरीष गवस यांच्या निधनाबाबत इन्फ्लुएन्सर अंकिता प्रभूवालावलकरने इन्स्टा्ग्रामवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. शिरीषच्या मृत्यूची बातमी ऐकून धक्का बसला, या बातमीवर विश्वासच बसत नाही, अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे.