Maharashtra Weather News : मुंबई, कोकणात श्रावणसरी; विदर्भात मात्र… IMD च्या इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष नको

महाराष्ट्रातील पावसानं श्रावणसरींचं रुप धारण केलेलं असतानाच राज्याच्या काही भागांमध्ये मात्र पावसाचा तडाखा बसणं कायम आहे. अशातच केंद्रीय हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार देश पातळीवर पुढील तीन दिवस काही राज्यांसाठी पावसामुळं संकट निर्माण करणआरे असतील, ज्यामुळं नागरिकांना सतर्कतेचं आवाहनही करण्यात आलं आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार जम्मू काश्मीर, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश आणि बिहार या राज्यांत मेघगर्जनेसह मुसधार पावसाची पूर्वसूचना देण्यात आली आहे.
महाराष्ट्रात कसं असेल हवामान?
गेल्या 48 तासांपासून राज्यात पावसाचा जोर बहुतांशी ओसरल्याचं पाहायला मिळालं आहे. तर मुंबईपासून कोकणापर्यंत श्रावणसरींची हजेरीसुद्धा पाहायला मिळत आहे. मात्र विदर्भाच्या पूर्वेकडील भागाची पावसाच्या माऱ्यातून सुटका झालेली नाही. पुढील 24 तासांसाठीसुद्धा इथं मुसळधार पावसाच्या धर्तीवर यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Maharashtra Weather)
पूर्व विदर्भात प्रामुख्यानं नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली अशा जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्चतवला आहे. दरम्यान मध्य महाराष्ट्रातही पाऊस काहीशी उघडीप देईल. तर, घाटमाथ्यावर धुक्याचं प्रमाण कमी होत तापमानात किंचित वाढ अपेक्षित असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही सूर्यकिरणं अधूनमधून डोकावणार असून, रायगड, रत्नागिरी इथं आकाश अंशत: ढगाळ राहील असा अंदाज आहे.
ऑगस्ट महिना पावसाचा…
ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांच्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्यात देशाच्या बहुतांश भागांमध्ये सामान्य ते सामान्यहून जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य भारताचे अनेक भाग, द्वीपकल्पीय भारताचे पश्चिम भाग, ईशान्य भारत,पूर्व भारताचे काही भाग आणि वायव्य भारतात तो सामान्यपेक्षा कमी असू शकतो, IMD चा हवाला देत त्यांनी ही माहिती दिली.
एकंदर राज्यात पावसाचं प्रमाण कमीजास्त होत असून आता ऑगस्टमध्ये पाऊस नेमकी कशी त्रेधातिरपीट उडवतो याचकडे सर्वांचं लक्ष राहील. तूर्तास पुढले 24 तास पावसाच्या तुरळक ते मध्यम सरींचे आणि अधूनमधून सुरू असणाऱ्या ऊन-पावसाच्या खेळाचे…. इतकच!