मोदींचा मास्टर स्ट्रोक! विरोधक शशी थरुर, सुप्रिया सुळेंवरच सोपवली मोठी जबाबदारी; जगभर फिरुन पाकिस्तानचे…

काश्मीरमधील पहलगाम येथे केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारताना ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत 6 आणि 7 मे रोजी मध्यरात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळ उडवून लावले. यामध्ये 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा भारताने केल्यानंतर पाकिस्तान अंतरराष्ट्रीय मंचावर फेक नरेटीव्हच्या माध्यमातून ‘व्हिक्टीम कार्ड’ खेळू पाहत आहे. पाकिस्तानच्या याच फेक नॅरेटिव्हजचा पर्दाफाश करण्यासाठी भारत सरकारने विशेष योजना आखली आहे. पाकिस्तानच्या खोट्या प्रचाराचा पर्दाफाश करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने मोहीम हाती घेतली आहे. विशेष म्हणजे या मोहिमेसाठी मोदी सरकार काँग्रेसचे खासदार शशी थरुर, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंवर विशेष जबाबदारी सोपवली आहे. याबद्दलचं पत्रकच जारी करण्यात आलं आहे.
नेमका प्लॅन काय?
पाकिस्तानच्या फेक नॅरेटिव्हजविरुद्ध आंतरराष्ट्रीय समुदायासमोर भारताचे मत मांडण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय खासदारांच्या संपर्कात राहून हलचाली सुरू केल्या आहेत. मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून 7 खासदारांचं प्रतिनिधीमंडळ तयार केलं आहे. हे प्रतिनिधीमंडळ विविध देशांच्या दौऱ्यावर जाणार असून सदस्य असलेल्या खासदारांना आधीच सरकारकडून निमंत्रण पाठवण्यात आले आहे.
कुठे-कुठे जाणार?
सर्वपक्षीय खासदारांचा समावेश असलेलं हे प्रतिनिधीमंडळ अमेरिका, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, कतार, संयुक्त अरब अमिराती आणि इतर देशांना भेट देणार आहे. हे सर्व दौरे 22 मे 2025 नंतर सुरू होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. हे प्रतिनिधीमंडळ पुढील आठवड्यात परदेश दौऱ्यावर जाणार आहेत.
कोणाकोणाचा समावेश?
सध्या मिळालेल्या माहितीनुसार, या प्रतिनिधीमंडळात खालील खासदारांचा समावेश-
1. काँग्रेस – शशी थरूर
2. भारतीय जनता पक्ष – रविशंकर प्रसाद
3. जनता दल युनायटेड – संजय कुमार झा
4. भारतीय जनता पक्ष – बैजयंत पांडा
5. द्रमुक – कनिमोळी करुणानिधी
6. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – सुप्रिया सुळे
7. शिवसेना – श्रीकांत एकनाथ शिंदे
महाराष्ट्रातील तीन खासदार
सदर यादीमध्ये अजून काही नावे जोडली जाऊ शकतात, असं सूत्रांनी सांगितलं आहे. सध्याच्या यादीमध्ये सुप्रिया सुळेंबरोबरच श्रीकांत शिंदे असे महाराष्ट्रातील दोन खासदार या यादीत आहेत.