देश

Kashmir Pahalgam terror attack: गोळीबार होण्यापूर्वी अमरावतीचे 11 जण हिरवळीवर आनंदाने बागडत होते, अवघ्या काही क्षणांचा फरक अन्…

काश्मीरच्या पहलगाम येथे मंगळवारी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. पोलिसांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारुन टिपून-टिपून मारले. या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर काही पर्यटक जखमी झाले आहेत.  या दहशतवादी हल्ल्यापूर्वी अमरावतीमधील 11 पर्यटक याच जागेवर होते. पण केवळ दैव बलवत्तर म्हणून  अमरावतीचे हे 11 पर्यटक हल्ल्याच्या काही मिनिटं आधी येथून निघाले आणि त्यांचा जीव वाचला. हे सर्व पर्यटक श्रीनगरमध्ये सुखरुप आहेत. या पर्यटकांमध्ये बोडके, देशमुख, उमेकर आणि लांडे कुटुंबीयांचा समावेश होता.

तर दुसरीकडे विठ्ठलाच्या कृपेने पंढरपूरमधील नागरिकांचा जीव या दहशतवादी हल्ल्यातून वाचला आहे. पंढरपूर येथून काश्मीरला गेलेले जवळपास 50 पेक्षा जास्त पर्यटक पुढची ट्रीप सोडून परतीच्या तयारीला लागले आहेत. पहलगामला पोहोचण्यापूर्वीच झालेल्या हल्ल्यानंतर पर्यटक घाबरले. त्यामुळे हे पर्यटक पुढची ट्रीप कॅन्सल करुन पुन्हा महाराष्ट्राच्या दिशेने परत निघाले आहेत.

सांगलीतील पालांदे कुटुंबीयही या दहशतवादी हल्ल्यातून थोडक्यात बचावले. सांगली मधील डॉ. विठ्ठल पालांदे हे कुटुंबासमवेत काश्मीर पहेलगाम येथे फिरण्यास गेले होते.  त्यांना चित्र काढण्याचा छंद आहे. ज्या ठिकाणी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर  हल्ला केलाय त्याच ठिकाणी हे कुटूंब तीन तास अगोदर  चित्र काढून बाहेर पडले. त्यामुळे या हल्ल्यातून हे कुटूंब बचावले.

जळगावमधील मैत्रिणींचा ग्रूप हल्ल्यातून बचावला

जळगाव मधील पत्रकार तुषार वाघुळदे यांच्या पत्नी किशोरी वाघुळदे आणि त्यांच्या मैत्रिणी रेणुका भोगे या पहेलगाम येथे मुंबई येथील क्षितीज ट्रॅव्हल्स या पर्यटन कंपनीसोबत काश्मीरला गेल्या होत्या.  पहलगामध्ये हल्ला झाल्याची माहिती मिळताच आम्ही घाबरलो होतो. मात्र, त्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षकांनी  तातडीने आम्हाला मदत केली. आम्ही सगळे सुखरुप आहोत. पहाटे साडेपाच वाजता आम्ही पहेलगाम येथून कटाराला जाण्यासाठी निघालो आहोत, अशी माहिती किशोर वाघदुळे यांनी फोनवरुन दिली.

महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू

जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झालाय. हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय. यात  डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे. तर पुण्यातील दोन आणि पनवेलच्या एका पर्यटकाचा मृत्यू झालाय. डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय. पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तर पनवेलमधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झालाय.  तर महाराष्ट्रातले एस बालचंद्रू, सुबोध पाटील, शोबीत पटेल हल्ल्यात जखमी झाले आहेत.

Related Articles

Back to top button