साधी महिला कॉन्स्टेबल, 2 कोटींचं घर, iPhone अन् एक लाखाचं घड्याळ; Insta Queen ला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पंजाब पोलीस दलातील वरिष्ठ महिला कॉन्स्टेबल अमनदीप कौरला अटक करण्यात आली आहे. ड्रग्जविरोधात सध्या पोलिसांची मोहीम सुरु असून, यादरम्यान तिला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पोलिसांना तिच्याकडे 17.71 ग्रॅम हेरॉईन सापडलं आहे. यानंतर तिला पोलीस दलातून निलंबित करण्यात आलं आहे.
पोलिस उपअधीक्षक हरबंस सिंह यांनी सांगितलं आहे की, पोलिसांनी अँटि-नार्कोटिक्स टास्क फोर्स (एएनटीएफ) सोबत, भटिंडा येथील बादल फ्लायओव्हरजवळ कौरची एसयूव्ही, महिंद्रा थार पकडली आहे.
“संयुक्त कारवाईचा भाग म्हणून आम्ही बादल उड्डाणपुलाखालील परिसराला वेढा घातला. जेव्हा आम्ही थार थांबवली आणि ड्रायव्हरची चौकशी केली तेव्हा त्यात अमनदीप नावाची व्यक्ती होती. तिच्यासोबत जसवंत सिंग नावाचा एक माणूस होता. गाडीची झडती घेतली असता आम्हाला 17.71 ग्रॅम हेरॉइन सापडले,” असं हरबंस सिंग धालीवाल म्हणाले.
अमनदीप कौर मानसा पोलिसात तैनात होत्या आणि अटकेच्या वेळी त्या भटिंडा पोलिस लाईन्समध्ये होत्या. कॉन्स्टेबलवर नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स अॅक्ट अंतर्गत आरोप ठेवण्यात आला आहे.
अमनदीप कौर ‘इंस्टा क्वीन’ म्हणून प्रसिद्ध
सोशल मीडियावर अमनदीप कौरचं “police_kaurdeep” नावाने अकाऊंट आहे. या अकाऊंटवर ती नेहमी आपल्या थारसह रील पोस्ट करत असते. यामधील अनेक रीलमध्ये ती पोलीस गणवेशात असते. तसंच फॅन्सी चष्मा आणि घड्याळ दाखवत असते. रील पोस्ट करताना ती प्रसिद्ध पंजाबी गाण्यांचा वापर करते. तिच्याकडे महागडा आयफोन असल्याचंही रीलमध्ये दिसतं. तिचे इंस्टाग्रामला 37 हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत.
राज्य पोलीस महासंचालक (डीजीपी) यांनी दिलेल्या आदेशात अधिकाऱ्यांना गणवेशात मॉडेलिंग करताना दाखवणारे फोटो, व्हिडीओ पोस्ट करण्यापासून परावृत्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कौरने सिद्धू मूसेवालाच्या गाण्यांचे व्हिडिओ पोस्ट केले आहेत, ज्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आलेल्या गायकाला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.
गुरमीत कौर नावाच्या एका महिलेने अमनदीप कौरच्या आलिशान जीवनशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तिच्याकडे 2 कोटींचं घर, दोन गाड्या आणि एक लाखांचं घड्याळ असल्याचा आरोप केला आहे. फेसबुकवरील एका व्हिडिओमध्ये गुरमीत कौरने दावा केला आहे की अमनदीप कौर तिचा पती बलविंदर सिंग, जो एक रुग्णवाहिका चालक आहे, त्याच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होती.
कौर आणि सिंग हेरॉइन विकण्यासाठी रुग्णवाहिकेचा वापर करायचे, असा आरोप गुरमीत कौर यांनी केला आहे. त्यांनी पोलिसांना याबद्दल माहिती दिली होती, परंतु कोणतीही कारवाई करण्यात आली नाही असाही आरोप आहे. कौरला ड्रग्ज कुठून मिळाले आणि ती कुठे घेऊन जात होती याचा तपास पोलिस करत आहेत.