बोरीवली, भायखळामधील सर्व बांधकामे बंद; मुंबईची हवा इतकी का बिघडली, पालिकेने सांगितली कारणे

मुंबईत हवेतील गारवा वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर हवेचा दर्जादेखील घसरला आहे. मुंबईत प्रदुषणात वाढ झाली आहे. पण मुंबईची हवा बिघडण्याची कारणे काय, जाणून घेऊयात. मुंबई महानगर पालिकेने मुंबई महानगरातील वायू प्रदूषणाची कारणे सांगितली आहेत. तसंच, महानगरपालिकेच्यावतीने वायू प्रदूषण नियंत्रणासाठी तातडीच्या व अल्पकालीन उपाययोजना देखील करण्यात येत आहेत.
वायू प्रदूषणाची कारणे
हिवाळ्यात वाऱयाचा कमी वेग आणि कमी तापमान यामुळे नैसर्गिक वायुवीजन कमी. त्यासमवेतच थंडीच्या कालावधीत कोरडे वारे आणि ढगाळ हवामान या कारणांमुळे वायू प्रदूषणात वाढ. वातावरणातील बदलांमुळे मुंबई महानगरासह मुंबई प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम. याचा परिणाम म्हणून हवेतील प्रदूषणात वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहेत. मुंबईतील नैसर्गिक हवामानाच्या स्थितीनुसार प्रदूषणाचे प्रमाण कमी-जास्त होत आहे. त्यासोबतच वाहनांचे उत्सर्जन, बांधकामांच्या ठिकाणी निर्माण होणारी धूळ तसेच स्थानिक हवामान या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून धुकेसदृश परिस्थिती निर्माण होते.
नागरिकांना आवाहन
वायू प्रदूषण टाळण्यासाठी शासन आणि प्रशासन करत असलेल्या प्रयत्नांमध्ये नागरिकांचे सहकार्य व सहभाग देखील मोलाचे. नागरिकांनी वैयक्तिक स्तरावर पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करणे हितावह.
शक्य तितक्या प्रमाणात सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे, खासगी वाहनांचा वापर कमी करणे, उघड्यावर कचरा जाळू नये, यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.
नागरिकांनी काय काळजी घ्यावी
– वायू गुणवत्ता निर्देशांक, वाईट ते अतिधोकादायक असलेल्या दिवसांमध्ये धावणे, जॉगिंग व कठोर शारीरिक व्यायाम / श्रम टाळावेत.
– वायू प्रदूषणाच्या कालावधीत फटाके फोडणे टाळावे.
– सिगारेट, बिडी आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करू नये.
-घरामध्ये स्वच्छता करताना झाडू मारणे ऐवजी ओल्या फडक्याचा वापर करावा.
-बंद घरामध्ये डासांच्या कॉइल, अगरबत्ती जाळणे टाळावे.
-निरोगी आहार फळे, भाज्या आणि पाणी इत्यादींचे सेवन करावे.
-श्वसनाचा त्रास, चक्कर येणे, खोकला, छातीत अस्वस्थता किंवा वेदना असल्यास जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा अथवा नजीकच्या महानगरपालिका दवाखाना / रुग्णालयात भेट द्यावी.
– प्रदूषण कालावधीत घराबाहेर जायचे असल्यास डिस्पोजेबल मास्कचा वापर करावा.
या भागातील बांधकाम बंद
मुंबईतील हवेचा स्तर वाईट झाला असून बोरिवली पूर्व व भायखळा परिसरातील हवेचा स्तर सातत्याने ‘अतिवाईट’ असल्यामुळे या दोन्ही भागांतील सर्व बांधकामे बंद करण्यात येणार आहेत. या परिसरातील खासगी आणि सार्वजनिक स्वरूपाची सर्व बांधकामे सुरक्षित पातळीवर आणून बंद करण्यासाठी २४ तासांची मुदत देण्यात आली आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी याबाबतची घोषणा केली. प्रदूषण नियंत्रणाच्या नियमावलीचे बांधकामांच्या ठिकाणी योग्य पालन होत नसल्यामुळे या विभागातील सरसकट सर्व बांधकामे बंद करण्याचा कठोर निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला आहे.