महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाहीय, इथे सर्व मुबलक; केवळ मतांच्या राजकारणासाठी…’- राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी विधानसभा निवडणुकीत 225 ते 250 जागा लढवणार असल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली. विधानसभेच्या निवडणुची तयारी त्यांनी सुरु केली असून राज ठाकरे सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आरक्षण मुद्द्यावर भाष्य केले. या महाराष्ट्रात इतक्या गोष्टी मुबलक प्रमाणात आहेत की तिथे आरक्षणाची गरजच नाही. पुणे, नागपूर अशा ठिकाणी फ्लायओव्हर वैगेरे सुविधा का होतात? मुळच्या लोकांसाठी नाही होत. बाहेरुन आलेल्या लोकांसाठी होतात. ठाणे हा जगातील एकमेव जिल्हा आहे जिथे 7 ते 8 महानगरपालिका आहेत. ही लोकसंख्या काय ठाण्यातील लोकांनी वाढवली? बाहेरुन येणाऱ्यांचा लोंढा खूप मोठा आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे लक्ष देण्यास सरकारकडे वेळ नाही. यूपी बिहारला नोकऱ्यांच्या जाहिराती येतात पण महाराष्ट्रातील रोजगाराकडे लक्ष देण्यास सरकारला वेळ नाही. गेली अनेक वर्षे असेच सुरु आहे. आता बेरोजगारांची यादी येत नाही. महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही. सर्वात आधी इथल्या मुलांना प्राधान्य द्या.
पंतप्रधान मोदींनी सर्व राज्य समान पद्धतीने पाहिली पाहिजेत. उद्या मराठी पंतप्रधान झाला आणि त्याने केवळ महाराष्ट्रातच अशा सुविधा आणल्या तर मी त्याला विरोध करेन. यावर आक्षेप घ्यायचे नाहीत का?
नरेंद्र मोदींच्या चांगल्याला चांगल म्हणणार, वाईटाला वाईट म्हणणार, असे ते म्हणाले.
आता जन्माला आलेला पक्ष आहे. अवघी 18 वर्षे झाली. कॉंग्रेसची स्थिती पाहा, काय झालीय. लाटा येत असतात, लाटा जात असतात. विधानसभेला काय होतंय ते पाहा, असे ठाकरे म्हणाले. मॅच फिक्सिंगच्या टिकेवरही योग्यवेळी उत्तर देणार असे राज ठाकरे म्हणाले.
धार्मिक स्थळांवरचा स्पीकर बंद करण्याची मागणी काही अंशी पूर्ण झाली. तुमचे सरकार आल्यावर मागणी पूर्ण होणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना पूर्णपणे बंद होणार, असे उत्तर त्यांनी दिले.
400 पार झाले की आम्ही संविधान बदलणार हे नेरेटिव्ह भाजपच्याच नेत्यांनी सेट केल्याचे राज ठाकरे म्हणाले.