देश

’15 मार्चपर्यंत भारताने…’, चीन दौऱ्यानंतर मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांचा भारताला इशारा

भारताने 15 मार्चपर्यंत मालदीवमध्ये तैनात केलेले लष्कर हटवावे असा इशाराच मालदीवने दिला आहे. मालदीवचे अध्यक्ष मोइझू यांनी भारताला 2 महिन्यांची मुदत दिली असल्याची माहिती मालदीवच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याना दिली आहे. भारत सरकारने मात्र यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया नोंदवलेली नाही.

भारताचे किती कर्मचारी
सध्या उपलब्ध अपडेटेड आकडेवारीनुसार मालदीवमध्ये भारताचे 88 लष्करी कर्मचारी तैनात आहेत. ‘सन ऑनलाइन’च्या वृ्त्तानुसार, मालदीवच्या अध्यक्षांच्या कार्यालयातील सार्वजनिक धोरण सचिव अब्दुल्ला नाझिम इब्राहिम यांनी एका पत्रकार परिषदेत याबद्दल भाष्य केलं. राष्ट्रपती मोइझू यांनी अधिकृतरित्या भारताला 15 मार्चपर्यंत लष्करी कर्मचारी माघारी घेण्यास सांगितलं आहे. भारतीय लष्करी कर्मचारी मालदीवमध्ये राहू शकत नाहीत, असं नव्यानेच सत्तेत आलेल्या मोइझू सरकारचं धोरण आहे.

दोन्ही देशांमध्ये बैठक
मालदीवमध्ये असलेलं भारताचं हे लष्कर मागे घेण्यासाठी मालदीव व भारताने उच्चस्तरीय गट तयार केला आहे. रविवारी सकाळी माले येथील परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या मुख्यालयामध्ये या गटाची पहिली बैठक पार पडली. या बैठकीसाठी भारताकडून उच्चायुक्त मुनु महावर हजर होते. नाझिम यांनीही या बैठकीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 15 मार्चपर्यंत भारताने सैन्य मागे घ्यावे अशी विनंती करण्याचा या बैठकीमागील मुख्य उद्देश होता, असं नाझिम यांनी स्पष्ट केलं. 17 नोव्हेंबर रोजी मालदीवच्या अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर लगेच मोइझू यांनी मालदीवमधून भारतीय लष्करी कर्मचारी माघारी बोलावण्याची औपचारिक विनंती भारताकडे केली होती. चीन दौऱ्यावरुन परतल्यानंतर मोइझू यांनी ‘आम्ही लहान असलो तरी आम्हाला वाटेल तशापद्धतीने वागणूक देण्याचा अधिकार कोणालाही नाही,’ असं सूचक विधान केलं होतं. त्यांच्या टीकेचा रोख भारताच्या दिशेने असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.

Related Articles

Back to top button