मोठी बातमी! उसाच्या रसापासून इथेनॉलच्या निर्मितीवरील बंदी मागे; केंद्र सरकारचा यु-टर्न

उसाच्या रसापासून इथेनॉलची निर्मिती करण्यावर बंदी घातल्यानंतर केंद्र सरकारने आता माघार घेतली आहे. केंद्र सरकारने ही बंदी उठवली आहे. केंद्राने बी हेवी मोलासिसपासून इथेनॉल बनवण्यास परवानगी दिली आहे. केंद्र सरकारने बंदी घातल्याने शेतकरी तसंच साखर कंपन्यांनी नाराजी जाहीर केली होती. याचे तीव्र पडसाद उमटण्याची भीती होती. महाराष्ट्र साखर आणि इथेनॉल उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य असल्याने त्याचे परिणाम राज्यातही दिसू शकत होते. पण सरकारने ही बंदी उठवल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.
केंद्र सरकारने उसाच्या रसापासून इथेनॉलची निर्मिती करण्यावरील बंदी उठवताना 17 लाख टन साखरेच्या निर्मितीची अट ठेवली आहे. 2023-24 साठी ही अट असून, ऑक्टोबर महिन्यापर्यंत ती लागू असणार आहे.
केंद्र सरकारने इथेनॉलची निर्मिती करण्यासाठी उसाचा रस वापरण्यास मनाई केल्यानंतर एक आठवड्यानंतर आता निर्णय मागे घेतला आहे. शेतकरी संघटना आणि साखर उद्योगांनी हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली होती. ” 2023-24 पुरवठा वर्षात (नोव्हेंबर-ऑक्टोबर कालावधी) इथेनॉल तयार करण्यासाठी साखर कारखान्यांना उसाचा रस आणि बी-हेवी मोलॅसेसचा वापर करण्यासाठी 17 लाख टन साखरेच्या एकूण मर्यादेत लवचिकता देण्यात आली आहे” अशी माहिती अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी पीटीआयशी संवाद साधताना दिली आहे.