Aditya Thackeray on CM Eknath Shinde: मी राजीनामा देतो, तुम्हीही राजीनामा देऊन वरळीत माझ्याविरोधात निवडणूक लढा; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना ओपन चॅलेंज

शिवसेनेतील (Shiv Sena) प्रबळ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि शिवसेनेत उभी फूट पडली. शिवसेना दोन गटांत विभागली गेली. एक शिंदे गट (Shinde Group) आणि दुसरा ठाकरे गट. दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या तोफा डागल्या जातात. तर अनेकदा खुली आव्हानंही देण्यात आली आहे. अशातच सध्या राजकीय वर्तुळात ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना दिलेल्या एका आव्हानाची चर्चा रंगली आहे. आदित्य ठाकरेंनी मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो, तुम्हीही राजीनामा द्या आणि माझ्याविरोधात वरळीतून निवडणूक लढवा, असं खुलं आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलं आहे.
आदित्य ठाकरे वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणुका घेण्यासाठी आव्हान दिलं आहे. मुंबईतल्या चेंबूरमधील कार्यक्रमात आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पुन्हा आव्हान दिलं आहे. मी राजीनामा देतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळीत माझ्यासमोर उभे राहावे आणि निवडणूक लढावी, असं थेट आव्हान मुख्यमंत्री शिंदेंना दिलं आहे. जेवढे खोके वाटायचे ते वाटा पण एक सुद्धा मत विकलं जाणार नाही, असं खुलं आव्हान आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना दिलं आहे.
आदित्य ठाकरे बोलताना म्हणाले की, “महाराष्ट्राचे 13 खासदार आणि 40 आमदार ज्यांनी गद्दारी केली आहे. त्यांना आज मी चॅलेंज देतोय. तुम्ही तुमच्या आमदारकीचा, खासदारकीचा राजीनामा द्या आणि पुन्हा निवडून कसे येता, ते दाखवाच. मी तर या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनाही चॅलेंज दिलंय. मी वरळीतून राजीनामा देतो, तुम्ही माझ्यासमोर वरळीतून उभे राहा, तुम्ही कसे निवडून येताय, ते मी बघतो.”
जेवढे खोके वाटायचेयत वाटा, पण एकही मत विकलं जाणार नाही : आदित्य ठाकरे
“जी यंत्रणा लावायचीये लावा, जी ताकद लावायचीये लावा, जेवढे खोके वाटायचेयत वाटा, पण एकही मत विकलं जाणार नाही. एकही शिवसैनिक विकला जाणार नाही.”, असा विश्वासही आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री आहेत ना, सध्या हातात ताकद आहे, म्हणून म्हटलं वरळीत या : आदित्य ठाकरे
“पाडणारच… पाडणारच… पण काय आहे मुख्यमंत्री आहेत ना, सध्या हातात ताकद आहे. म्हणून म्हणतोय वरळीत या. तसे प्रत्येक आठवड्यात येत असतात ते लपून छपून येतात. कुठेतरी नारळ फोडण्याचा प्रयत्न करतात.”, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर थेट निशाणा साधलाय.