मोठी बातमी! जालना अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यात तलाठी अन् महसूल कर्मचाऱ्यांच्या निलंबनंतर महसूल मंत्र्यांचा मोठा निर्णय

जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाल्यानंतर या प्रकरणात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी ( 8 ऑगस्ट) रात्री उशिरा जालना येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जालन्यात शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी अनुदानामध्ये तहसीलदारांचे लोगिन आणि पासवर्ड वापरून सुमारे 40 कोटींचा घोटाळा तलाठी लिपिकासह कृषी सहाय्यकांनी केल्याचा समोर आलं होतं . या प्रकरणात 17 तलाठ्यांसह 57 महसूल कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आलं होतं . आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट FIR दाखल करण्याचा आदेश बैठकीत दिले आहेत . (Jalna Agriculture Scam)
40 कोटींचा घोटाळा उघड
जालना जिल्ह्यात 2022 ते 2024 दरम्यान अतिवृष्टी, पूर आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदान वाटपात गंभीर गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्या होत्या. तपासात उघड झाले की, तहसीलदारांचे लॉगिन आणि पासवर्ड वापरून सुमारे 40 कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला आहे. या घोटाळ्यात तलाठी, लिपिक आणि कृषी सहाय्यक यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.2022-2023 मध्ये झालेल्या अतिवृष्टी, पुर आणि गारपीटीमुळे जालना जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं होतं. 2022 आणि 23 साली अतिवृष्टीमुळे 1103 कोटी मंजूर झाले होते. त्यापैकी 983 कोटी वाटप झाले आहेत. या वाटप अनुदानातल्याच शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांवरच काही अधिकाऱ्यांनी डल्ला मारल्याचं स्पष्ट झालं
या प्रकरणात आतापर्यंत 17 तलाठ्यांसह एकूण 57 महसूल कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. एफआयआर नोंदवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश महसूल मंत्र्यांनी दिले आहेत.
चार तासांची बैठक,बावनकुळेंचा इशारा
आमदारांसोबत जवळपास चार तास चाललेल्या बैठकीत या घोटाळ्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये दोषींनी अनुदानाची रक्कम पात्र शेतकऱ्यांना न देता, संगनमत करून गैरव्यवहार केल्याचे स्पष्ट झाले. महसूल मंत्री बावनकुळे यांनी या प्रकाराला “शेतकऱ्यांवरील अन्याय” ठरवत, दोषी कोणताही असो, त्याला शिक्षा होणारच असा इशारा दिला.
बैठकीला आमदार बबनराव लोणीकर, संतोष दानवे, नारायण कुचे, हिकमत उढाण आणि अर्जुन खोतकर उपस्थित होते. आमदारांनी घोटाळ्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती.शेतकऱ्यांच्या भावनांशी कोणीच खेळू नये असे म्हणत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना खडसावले आहे . महसूल मंत्री बावनकुळे हे आज (9 ऑगस्ट) जालना आणि बुलढाणा दौऱ्यावर होते. जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीला विभागीय आयुक्त जीतेन्द्र पापळकर, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नु पी. एम., पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार उपस्थित होते. यावेळी मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला की, “शेतकऱ्यांच्या भावनांशी कोणीही खेळू नये.”