पोलीस गँगने आले अन् वकिला खेचत घेऊन गेले; व्हिडिओ समोर येताच वकिलांचे कामबंद आंदोलन

जिल्ह्याच्या विटा (Sangli) परिसरातील एक धक्कादायक घटना समोर आली असून मध्यरात्री पोलिसांच्या (Police) गँगने वकिलाच्या घरात घुसून त्यांना पोलीस ठाण्यात नेले होते. या घटनेनचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर आता पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, संबंधित व्यक्ती शासकीय कामात अडथळा आणत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचं स्पष्टीकरण पोलिसांनी दिली आहे. मात्र, पोलिसांनी एका गावगुंडाप्रमाणे वकिलांना फरफटत नेल्याने वकिल संघटना आक्रमक झाल्या असून, जिल्ह्यातील सर्व वकिलांनी एक दिवस कामबंद आंदोलन पुकारलं आहे. तसेच, या घटनेची वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.
विटा शहरातील एका ठिकाणी तडीपार गावगुंड रहात असल्याच्या संशयावरून गेली सहा महिने काही पोलीस येऊन रात्री अपरात्री फोटो आणि सेल्फी काढत होते. तसेच पोलिसांकडून या ठिकाणी गुन्हेगार शोध मोहीम देखील राबवली जात होती. परंतु या घटनेचा परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याबाबत वकील विशाल कुंभार यांनी पोलिसांविरोधात तक्रार केली होती. एका वकिलाने पोलिसांविरोधात आवाज उठवल्याने पोलिसांना राग आला. दोन दिवसांपूर्वी एका अधिकाऱ्यांसह आठ ते दहा पोलीस वकिलाच्या घराजवळ दाखल झाले.
संबंधित वकिलाला अर्ध्या कपड्यातच घरातून बाहेर खेचत पोलिसांनी ठाण्यात नेलं. या घटनेमुळे मात्र वकील संघटनांकडून पोलिसांच्या कृत्याचा तीव्र निषेध केला जात आहे. दरम्यान, याबाबत विटा पोलिसांशी संपर्क साधला असता शासकीय कामात अडथळा आणल्याने संबंधित वकिलावर गुन्हा दाखल करून सदरची कारवाई करण्यात आली असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सर्वच न्यायालयातील वकिलांनी या घटनेच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन केलं. तसेच पोलीस अधीक्षकांची भेट घेत कारवाई करण्याची मागणी केली. अखेर, एका गावगुंडाला फरफटत न्यावं अशाप्रकारे वकिलांना नेल्याचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आल्याने खळबळ उडाली असून वकिल संघटना संतप्त झाल्या आहेत. त्यामुळे आता तरी त्या पोलिसावर कारवाई होणार का? याकडे वकिलांचे लक्ष लागून राहिलेय. दरम्यान, बाबत विटा पोलिसांशी संपर्क साधला असता शासकीय कामात अडथळा आणल्याने संबंधित वकिलावर गुन्हा दाखल करून सदरची कारवाई करण्यात आला असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे.