Pune Crime Kothrud: पुण्यातील दलित मुलींच्या मारहाण प्रकरणात मोठी अपडेट, ससून रुग्णालयाचा रिपोर्ट लीक, कोथरुड पोलिसांना क्लीनचिट?

पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात तीन दलित मुलींना मारहाण आणि छळ झाल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला होता. या तिन्ही मुलींनी पोलिसांविरोधात (Kothrud Police) दाद मागत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयात रविवारी रात्री तीन वाजेपर्यंत या तीन मुलींसह राजकीय पक्षांचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते ठाण मांडून बसले होते. या संपूर्ण घटनेमुळे मोठे वादळ निर्माण झाले होते. मात्र, कोथरुड पोलिसांविरोधात पुणे पोलिसांनी (Pune Police) शेवटपर्यंत कोणताही गुन्हा दाखल करुन घेतला नव्हता. अशातच आता याप्रकरणातील आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
कोथरुड पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केलेल्या मुलींचा ससून रुग्णालयातील अहवालातील माहिती समोर आली आहे. पोलिसांनी अधिकृतरित्या हा अहवाल जाहीर केला नसला तरी त्यामधील माहिती बाहेर आली आहे. कोथरुड पोलीस ठाण्यात तब्बल चार तास पोलिसांनी छळ केल्यानंतर पिडीत मुलींनी स्वत: ससून रुग्णालयात जाऊन त्यांची तपासणी करुन घेतली होती. मात्र, या अहवालात मुलींच्या अंगावर कोणत्याही ताज्या जखमांच्या खुणा नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. हा अहवाल कोथरुड पोलिसांसाठी मोठा दिलासा ठरण्याची शक्यता आहे. तर पोलिसांकडून लाथा-बुक्क्यांनी मारहाणीचा आरोप केलेल्या मुलींची बाजू या अहवालामुळे कमकुवत होण्याची शक्यता आहे.
Pune Dalit Girls Torture: या प्रकरणाची नेमकी क्रोनोलॉजी काय?
* 1 ऑगस्टला हा सगळा प्रकार घडला.
* दुपारी अडीच वाजता पोलीस मुलींच्या घरी आले, 30 मिनिटांनी पोलीस निघून गेले.
* त्यानंतर साडेचार वाजता पोलीस पुन्हा घरी आले आणि मुलींना पोलीस ठाण्यात घेऊन गेले.
* 1 ऑगस्टलाच 4:30 ते 7:50 वाजेपर्यंत पोलिसांनी या मुलींना पोलीस ठाण्यात बसवून ठेवलं.
* 1 ऑगस्टला मध्यरात्री 2 वाजता या मुलींनी तक्रार दाखल केली.
* 2 ऑगस्टला सकाळपासून मुलींनी तक्रार दाखल करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
* यासोबतच मेडीकल करुन घेण्याचीदेखील मागणी केली. मात्र, पोलिसांनी त्यांची वैद्यकीय चाचणी करुन घेतली नाही. त्यांना मेडिकल तपासण्याची लिस्टदेखील दिली नाही.
* त्यानंतर मुलींनी स्वत:चं मेडिकल करुन घेण्याचा निर्णय घेतला आणि मुलींनी ससून रुग्णालय गाठलं.
* 2 ऑगस्टला 5:40 वाजता या मुली त्यांच्या सहकाऱ्यांसोबत ससून रुग्णालयात तपासण्या करण्यासाठी आल्या.
* 2 ऑगस्टला संध्याकाळी 6:30 वाजता त्यांची तपासणी सुरु झाली.
* या तपासण्यानंतर ससूनचा अहवाल समोर आला
* त्यात २४ तासात कोणत्याही ताज्या जखमा किंवा व्रण नाही, असं अहवालात समोर आलं आहे.
Pune Crime news: नेमकं प्रकरण काय?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 23 वर्षीय विवाहित महिला आपल्या पतीकडून होणाऱ्या सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून पुण्यात आली होती. त्या मुलीला मदत केलेल्या तीन मुलींना स्थानिक पोलिसांकडून कोणतीही पूर्वसूचना न देता ताब्यात घेतलं गेलं. तसेच त्या महिलांवर पोलीस स्टेशनमध्ये जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि लैंगिक अपमान केल्याचा आरोप मुलींनी केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील, संभाजीनगर पोलीस स्टेशनचे अमोल कामटे आणि छत्रपती संभाजीनगर येथील महिला कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे यांच्यावर थेट मारहाणीचे आरोप करण्यात आले आहेत.