‘महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; एकदा जमीन विकली, भाषा संपली तर…’; रायगडवासियांना राज ठाकरेंचं आवाहन

शेतकरी कामगार पक्षाच्या 78 व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळाली. यावेळी उपस्थितांना जयंत पाटील यांच्या आग्रहास्तव ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यासमवेत इतरही महत्त्वाच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन करत हक्कानं संवाद साधल्याचं पाहायला मिळालं.
मुख्यमंत्र्यांवर टीकेचा सूर आळवत काय म्हणाले राज ठाकरे?
मराठी आणि भाषावादाचा मुद्दा अधोरेखित करत मुख्यमंत्री महाराष्ट्रातील लहान मुलांना हिंदी कशी शिकवता येईल याचा विचार करतायत पण, राज्यात जे कामधंद्यांसाठी बाहेरून येतात त्यांना मराठी कशी येईल याचा विचार मुख्यमंत्र्यांच्या मनात नाही, अशा शब्दांत राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भूमिकेवर निशाणा साधला.
रायगड जिल्ह्यात भीषण वास्तव… असं का म्हणाले राज ठाकरे?
‘महाराष्ट्रामधील मराठी माणूस, महाराष्ट्रातील भूमिपूत्र याचा विचारच नाही. याचं सर्वात मोठं भीषण स्वरुप असेल तर तो रायगड जिल्हा आहे. आज या रायगड जिल्ह्यात अनेकांच्या शेतजमिनी चालल्या आहेत. कुठे चालल्या आहेत, काय चाललं आहे? जमिनीचे व्यवहार करणारे पण आपलेच. इथं कुंपणच शेत खातंय. शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्यात, इथं उद्योगधंदे येतायत आणि बाहेरची माणसं येतायत’, असं म्हणत त्यांनी स्थानिकांना जिल्ह्यातील वस्तूस्थिती बोलून दाखवली.
आज ज्या पक्षासाठी आलोय त्याचं नाव शेकाप. एकिकडे शेतकरी बर्बाद होतोय, दुसरीकडे बहेरून कामगाल येतायत. शेकापचा काय उपयोग? असं म्हणत ‘जयंतराव या रायगड जिल्ह्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर घेतली पाहिजे आणि जो शेतकरी आहे तो बर्बाद होणार नाही, रायगडमधील मराठी तरुण- तरुणी येथील उद्योगधंद्यांमध्ये कामाला लागलं पाहिजे’ यावर लक्ष दिलं गेलं पाहिजे असा आग्रही सूर त्यांनी आळवला.
‘…तर जगाच्या पाठीवर तुम्हाला स्थान नाही’
‘देशाचा गृहमंत्री ठणकावून सांगतो मी हिंदी नाही, गुजराती आहे. तिथं मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अनेक उद्योग गुजरातला गेले. आम्ही बोललो की मात्र संकुचित कसे होतो?’, असा उपरोधिक प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि आपल्या वक्तव्याचाच पुनरुच्चार केला. ‘एकदा तुमची भाषा संपली आणि एकदा तुमची जमीन गेली तर जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठंही स्थान नाही’, असं राज ठाकरे म्हणाले.
गुजरातमधील जमीन खरेदीचा कोणता कायदा ठाकरेंकडून अधोरेखित?
‘गुजरात अॅग्रीकल्चरल लँड अॅक्टनुसार अनिवासी भारतीय आणि जे गुजरातचे नाहीत त्यांना शेतजमीन विकत घेता येत नाही. हे भारतातच सुरुय. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या राज्यातील शेतजमीन कोणीही जाऊन विकत घेऊ शकत नाही. विकत घ्यायची असेल तर आरबीयकडून फेमाअंतर्गत त्यासाठी विशेष परवानगी खघ्यावी लागते’, असं सांगत प्रत्येकजण आपल्या राज्याचा विचार करतो. आम्ही का नाही करायचा? असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
जमिनी विकू नका, व्यवसायात पार्टनर व्हा; रायगडवासियांना मार्गदर्शन
रायगड जिल्ह्यामध्ये कोण जमिनी घेतंय, कोण येतंय काय माहित नाही असं म्हणताना ठाणे जिल्ह्यातील परिस्थितीसह कोकणातील रायगड, रत्नागिरीचाही इल्लेख करत तिथं अनेकांनी जमिनी घेतल्या आणि त्या आमचेच लोकं विकतायत पण त्यांना कळतच नाहीये की यातून आम्हीच संपणार आहोत, असं सूचक विधान राज ठाकरे यांनी केलं. स्थानिकांना आणि राज्यातील प्रत्येक भूमिपुत्राला आवाहन करत, ‘यापुढे उद्योगधंद्यांसाठी आणि जमिनीसाठी तुमच्याकडे लोक आले तर, जमिनी नुसत्या विकायच्या नाहीत. तर त्यांना म्हणावं आम्ही कंपनीत कामालाही लागू आणि शेतकरी असून कंपनीत पार्टनर म्हणून येऊ, फुकटच्या जमिनी देणार नाही’, असंही मार्गदर्शन त्यांनी केलं. परिस्थिती वेळीच सावरली नाही तर उद्या याच ठिकाणी याच रायगडमध्ये अमराठी नगरसेवक, आमदार, खासदार निवडून येतील, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
अर्बन नक्षलवाद आणि आपण… काय म्हणाले राज ठाकरे?
बाहेरुन कोणतरी उद्योपती येणार आणि वाटेल ते थैमान घालणार, राज्य सरकारने म्हणे जमिनीवर कायदा आणला. ज्यात अर्बन नक्षल असा उल्लेख आहे. कोणत्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार अटक करु शकतं… एकदा करुच देत, असं म्हणत त्यांनी सरकारला ललकारलं. या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या थडग्यावर उद्योग उभा राहणार नाही अशा स्पष्ट शब्दांत ठणकावत ‘उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा मानसन्मान राखून आणावे लागतील त्याशिवाय उद्योग आणता येणार नाही’ याच भूमिकेवर राहत महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका अशी कळकळीची विनंती राज ठाकरे यांनी रायगडवासिय आणि तमाम मराठी भाषिकांना केली.
शेकापच्या या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये जयंत पाटील, शेकापमधील सर्व पदाधिकारी यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून राज ठाकरे आणि संजय राऊत यांची उपस्थिती पाहायला मिळाली. सोबत बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि इतरही नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. दरम्यान या कार्यक्रमामुळं कैक राजकीय चर्चांनाही उधाण आल्याचं पाहायला मिळालं.