महाराष्ट्रात काहीतरी मोठं घडणार? कार बदलून शिंदे बड्या नेत्याच्या भेटीला! दिल्लीत रात्री नेमकं काय घडलं?

शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. एकनाथ शिदेंच्या अचानक दिल्ली दौऱ्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून राज्यात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. राज्यातील खासदारांचे दिल्लीतील प्रश्न सोडवण्यासाठी एकनाथ शिंदे गेल्याचं स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिलं आहे. मात्र कोणत्याही पूर्वसेचनेशिवाय झालेल्या या दिल्ली दौऱ्यामुळे राज्याच्या राजकारणात पडद्यामागे घडामोडींना वेग आल्याची चर्चा आहे.
एकनाथ शिंदे दिल्लीत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला पोहोचले असल्याने राज्याच्या राजकारणात पडद्यामागे घडामोडींना वेग आला असून, महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? अशी शंका उपस्थित होत आहे.
एकनाथ शिंदेंना गाडी बदलून घेतली बड्या नेत्याची भेट
महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे अनेक घडामोडी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौ-यावर गेले आहेत तर दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल राज्यपालांची भेट घेतली आहे. या दोन्ही घडोमोडींच्या टायमिंगवरून राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
सध्या संसदेचं अधिवेशन सुरू असून त्यापार्श्वभूमीवर शिंदेंचा दिल्ली दौरा असल्याचं बोललं जात आहे. मात्र एकनाथ शिंदेंनी काल रात्री दिल्लीत एका बड्या नेत्याची भेट घेतली. कार बदलून शिंदेंनी ही भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या भेटीबाबत कमालाची गुप्तता पाळण्यात आली होती.
गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेचे मंत्री वादात सापडले आहेत. तसंच लवकरच शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी होणार आहे. या बड्या नेत्याच्या भेटीत या दोन्ही मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. दुसरीकडे फडणवीस आणि राज्यपालांच्या भेटीचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. पण या दोन भेटीमुळे महायुतीत मोठं काहीतरी घडत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.