देश

कोकण रेल्वेने कार ऑन ट्रेन सेवा सुरू केली खरी, पण….; नागरिकांना येऊ शकते ही मोठी अडचण

गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकण रेल्वेने कार ऑन ट्रेन ही सेवा सुरू केली आहे. या सेवेमुळं चाकरमान्यांना कार थेट कोकणात घेऊन जाता येणार आहे. मात्र कोकण रेल्वेच्या या सेवेला अल्पप्रतिसाद मिळत आहे. कारण या सेवेचा थांबा रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात नसल्याने नागरिकांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

कोकण रेल्वेने 23 ऑगस्टपासून रायगड जिल्ह्यातील कोलाड ते गोवा राज्यातील वेर्णा दरम्यान कार ऑन ट्रेन ही सेवा सुरू केली आहे. या सेवेमुळं नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार असल्यामुळं अनेकांसाठी हा दिलासादायक निर्णय वाटला होता. मात्र रेल्वेची ही सेवा फक्त गोव्यापर्यंतच आहे. कारण रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत कोणताही पिकअप पॉइंट नसल्याने दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांना या सेवाचा लाभ घेता येणार नाही.

दरम्यान, रेल्वेतून एकावेळी 40 कार घेऊन जाता येणार आहेत. मात्र आत्तापर्यंत फक्त एकच बुकिंग झाली आहे. तर, रविवारी 38 जणांनी चौकशीसाठी संपर्क साधला होता. 13 ऑगस्टपर्यंत कमीत कमी 13 बुकिंग आल्या नाही तर ट्रेन रद्द करण्यात येईल. तसंच, नागरिकांना त्यांचा रिफंड देण्यात येईल.

कोणत्या दिवशी सेवा असणार?
कोलाड ते वेर्णाः 23,25,27,29,31 ऑगस्ट आणि 2,4,6,8,10 सप्टेंबर
वेर्णा ते कोलाडः 24,26,28,30 ऑगस्ट आणि 1,3,5,7,9,11 सप्टेंबर

किती असेल शुल्क?
प्रति कार 7,875 (5 टक्के जीएसटी सह)
बुकिंग करताना- 4 हजार
उर्वरित रक्कम- 3,875 प्रस्थानाच्या दिवशी स्टेशनवर भरावी लागणार
प्रति ट्रिप क्षमताः 40 कार (20 वॅगन* प्रत्येकी 2 कार)
टीपः 16 कार बुक झाल्यानंतरच ट्रिप सुरू होईल अन्यथा शुल्क परत दिले जाईल.

आवश्यक कागदपत्रे कोणती?
आधार कार्ड (झेरॉक्स कॉपी)
पॅन कार्ड
कार नोंदणी प्रमाणपत्र

गणेशोत्सवासाठी 44 ट्रेन कोकणासाठी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. नागरिकांना कोकणात जाण्यासाठी सुरुवातीला 194 ट्रेन सोडण्यात आल्या होत्या. मात्र या 194 ट्रेनचे आरक्षण फुल्ल झाले आहे. त्यामुळं आता रेल्वे प्रशासनाने 44 अतिरिक्त विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दिवा-चिपळूण-दिवा मेमूच्या 2 तर दिवा- खेड दरम्यान 36 फेऱ्या वाढणार आहेत. या 44 सेवा वाढल्यानंतर 296 वर पोहोचली आहे.

Related Articles

Back to top button