‘CCTV नसलेल्या रुममध्ये नेऊन छातीवर…’, विद्यार्थ्यीनींच्या जबाबाने जालना हादरलं; शिक्षकानं काय केलं पाहिलं का?

जालना शहराला हादरवून टाकणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील क्रीडा प्रबोधिनीतील एका क्रीडा शिक्षकाने चार विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात पोलिस आणि शिक्षण विभागाने चौकशी केल्यानंतर अखेर या क्रीडा शिक्षकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांना काय माहिती मिळालेली?
जालना शहरातील क्रीडा प्रबोधिनीत ग्रामीण भागातील अल्पवयीन विद्यार्थिनी क्रीडा शिक्षण घेतात. या ठिकाणी क्रीडा शिक्षक प्रमोद खरात हा व्यवस्थापक म्हणून काम पाहतो. याच क्रीडा शिक्षकाकडून येथील अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण होत असल्याची गोपनीय माहिती पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना मिळाली होती. शिक्षण विभागानं देखील या प्रकरणात शनिवारी चौकशी केली.
कशी सुरु झाली चौकशी?
बन्सल यांना सरद प्रकरणासंदर्भात आधीपासूनच शंका असल्याने सहायक पोलिस निरीक्षक आरती जाधव यांनी या पीडित मुलींची चौकशी केली. या चौकशीदरम्यान पीडित मुलींच्या भावनांचा बांध फुटला आणि त्यांनी सर्व घटनाक्रम सांगितला.
आरोपी या मुलींबरोबर नेमकं काय करायचा?
क्रीडा प्रबोधिनीमधील ज्या खोल्यांमध्ये सीसीटीव्ही नसायचा तिथेच क्रीडा शिक्षक आम्हाला वारंवार घेऊन जायचे. खोलीमध्ये गेल्यानंतर हा शिक्षक आमच्या छातीवरुन, पाठीवरुन आणि गळ्यावरुन हात फिरवायचा. आमच्यासोबत अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न या शिक्षकाकडून व्हायचा, असा आरोप या पीडित मुलींनी केला आहे. यासंदर्भात विद्यार्थिनींनी आपल्या पातळीवर प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती.
शिक्षणअधिकारी तपासासाठी पोहोचले तेव्हा काय झालं?
या तक्रारीनंतर जालना पंचायत समितीचे गट शिक्षणअधिकारी मनोज कोल्हे आणि महिला केंद्र प्रमुख सुजाता भालेराव यांनी या ठिकाणी भेट दिली. या वेळेस अनेक विद्यार्थिनींनी असे प्रकार घडत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. अखेर या प्रकरणात गट शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून क्रीडा शिक्षक आणि प्रबोधिनी व्यवस्थापक प्रमोद खरातच्या विरोधात विनयभंग आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोण करत आहे पुढील तपास?
पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला बेड्या ठोकल्या असून या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक आरती जाधव करीत असल्याची माहिती जालन्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली. आरोपीने यापूर्वीही अशाप्रकारे विद्यार्थिनींची छेड काढली आहे का? यापूर्वीही त्याने असे प्रकार केले असतील तर अशा पीडित विद्यार्थिनी किती आहेत? यासारख्या प्रश्नांचाही माग काढण्याचं काम पोलीस करत आहेत.