Mumbai Rains Update: मुंबईकरांनो सावधान! समुद्राला येणार मोठी भरती; मरीन ड्राईव्ह परिसर खाली करण्याच्या पोलिसांच्या सूचना, पालिका प्रशासन अलर्ट मोडवर

बंगालच्या उपसागरात असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रुपांतर डिप्रेशनमध्ये झाल्याने मुंबई, मुंबई उपनगर, ठाण्यासह कोकणात सध्या जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईत (Mumbai Rains) आज सकाळपासूनच पावसाने जोर पकडला आहे. सोबतच, वाऱ्याचा वेग देखील अधिक आहे. अशातच मरीन लाईन्स परिसरात मात्र सध्या पावसाचा जोर ओसरला असला तरी सध्या मोठ्या प्रमाणात समुद्रात लाटा उसळताना पाहायला मिळत आहेत. आज (25 जुलै) दुपारी 12 वाजून 38 मिनिटांनी समुद्राला मोठी भरती येणार असून यावेळी 4.64 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनी समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये, असं आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, पुढील 3 ते 4 तास मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, अशा सूचना देण्यात आली आहे. सध्या मुंबईत अंधारमय वातावरण पाहायला मिळत आहे. सध्या मुंबई शहरात व लागतच्या जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असून नागरिकांना विनंती आहे की त्यांनी किनारपट्टी भागात जाणे टाळावे, वाहने सावकाश चालवा आणि विनाकारण घराबाहेर पडू नये. तसेच पोलीसांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून कृपया आपत्कालीन परिस्थितीत #100 #112 डायल करा. असे आवाहान मुंबई पोलिसांनी केलं आहे.
अलिबागसाठी आजच्या भरती-ओहोटीच्या वेळा (शुक्रवार,25 जुलै)
पहिली ओहोटी – सकाळी 5.32 वाजता – 0.25 मीटर (0.82 फूट)
भरती – दुपारी 12.14 वाजता – 4.26 मीटर (13.98 फूट)
दुसरी ओहोटी – संध्याकाळी 6.22 वाजता – 1.21 मीटर (3.97 फूट)
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सर्वाधिक पावसाची नोंद झालेली ठिकाणे :
– पश्चिम उपनगरे
1. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालय – 67.3 मिमी
२. मलपा डोंगरी महानगरपालिका शाळा, अंधेरी – 66.6 मिमी
३. नारियलवाडी महानगरपालिका शाळा, सांताक्रुझ- 65.3 मिमी
४. के (पूर्व) विभाग (वॉर्ड) कार्यालय – 65.2 मिमी
पूर्व उपनगरे
1 . एन विभाग (वॉर्ड) कार्यालय – 58.5मिमी
2. टेंबीपाडा महानगरपालिका शाळा, भांडुप- 57.8 मिमी
3. रमाबाई महानगरपालिका शाळा, घाटकोपर- 53.4 मिमी
4. पासपोळी पवई महानगरपालिका शाळा, पवई- 52.6 मिमी
5. बांधकाम प्रस्ताव कार्यालय, विक्रोळी (पूर्व) – 51.8 मिमी
-शहर
1. प्रतिक्षानगर महानगरपालिका शाळा, शीव (सायन) – 30.2 मिमी
2. रावळी कॅम्प -22.35 मिमी
राज्यात आज मुसळधार; कोणत्या भागात कोणता अलर्ट?,
मुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट): रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) : मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, वर्धा, नागपूर.
जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) : पालघर, नाशिक घाटमाथा, सातारा, कोल्हापूर, अमरावती, हिंगोली, नांदेड.
विजांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) : जालना, परभणी, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ.