देश

एका चुकीमुळे 4 वर्षीय मुलीचा आईच्या डोळ्यादेखत 12 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू, चप्पल घालताना..; CCTV चर्चेत

लहान मुलं आजूबाजूला असताना फार काळजी घेतली पाहिजे असं सांगितलं जातं. लहान मुलांना संभाळणं हे फार कठीण काम आहे. मुलांवरील नजर वळली की ते काय करतील सांगता येत नाही. मुलांकडे केलेलं दुर्लक्ष कधीकधी त्यांच्या जीवावर बेतू शकतं. असाच एक धक्कादायक प्रकार वसईमध्ये घडला आहे. आईने केलेल्या एका छोट्याश्या चुकीमुळे एका चिमुकलीचा 12 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला आहे. हा सारा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे. काळजाचा थरकाप उडवणारा घटनाक्रम सध्या चर्चेचा विषय ठरतोय.

काळजाचा थरकाप उडवणारी दृश्य
वसई पूर्वेतील नवकार सोसायटीतील इमारतीमध्ये ही विचित्र दुर्घटना घडली. या इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून खाली पडून चार वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली होती. दोन दिवसांनंतर या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. पालकांची नजर जरा इकडे तिकडे वळाली तरी क्षणभरात होत्याचं नव्हतं होतं, हे या व्हिडीओमधून दिसत आहे. मयत चिमुकलीचं नाव अन्विका प्रजापती असं आहे.

सीसीटीव्हीमध्ये काय?
चार वर्षाची अन्विका तिच्या आईसोबत घराबाहेर जात होती. अन्विका आईसोबत घराबाहेर जात असताना तिला चप्पल ठेवण्याच्या लाकडी स्टँडवर बसवले. लाकडी स्टॅण्ड लॉबीजवळच्या खिडकीला लागून होते. मुलीला चप्पल ठेवण्याच्या लाकडी स्टॅण्डवर बसवल्यानंतर चप्पल घालण्यासाठी तिची आई दुसऱ्या बाजूला वळाली. इतक्या अन्विका तेथील खिडकीवरील कठड्यावर बसण्यासाठी गेली. मात्र अचानक अन्विकाचा तोल गेला. या खिडकीची काच लावलेली नसल्याने आणि खिडकीला कोणतंही सुरक्षा जाळी नसल्याने काही समजण्याच्या आत चार वर्षांची चिमुकली खिडकीतून खाली पडली. खाली कोणताही स्लॅब किंवा इतर काहीही अडथळा नसल्याने अन्विका थेट 12 व्या मजल्यावरुन खाली कोसळली. गंभीर जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. हा संपूर्ण सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरतोय. सदर दृश्य ही कोणालाही विचलित करतील अशीच आहेत.

काळजी घेणं गरजेचं
सीसीटीव्हीमधील हा धक्कादायक प्रकार पाहून कोणाच्याही काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही. या दुर्घटनेमधून लहान मुलांच्या सुरक्षेबद्दल पालकांनी अधिक जागृक राहण्याची गरज असल्याचं अधोरेखित होत आहे. तसेच लहान मुलं वावरत असलेल्या इमारती आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये सुरक्षेसंदर्भातील सर्व उपाययोजना केलेल्या आहेत की नाही हे पाहणंही या साऱ्या प्रकारेमुळे चर्चेत आलं असून पालकांनी सजग राहणं किती महत्त्वाचं आहे हे दिसून येत असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.

Related Articles

Back to top button