अपराध समाचारदेश

वेड्यावाकड्या चालीमुळं जोडप्यावर संशय आला अन् सापडलं 20 कोटींचं घबाड; गुजरातमधल्या एअरपोर्टवरील थरार

गुजरातमधील सूरत विमानतळावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल म्हणजेच सीआयएसएफने केलेल्या कारवाईमध्ये मोठं घबाड हाती लागलं आहे. या कारवाईमध्ये तस्करीच्या माध्यमातून देशात आणलं जाणारं 28 किलो सोनं सीआयएसएफच्या हाती लागलं आहे. यापैकी 23 किलो सोनं हे शुद्ध सोनं असून त्याची पेस्ट करुन ते भारतात आणण्याचा डाव होता. 20 जुलैच्या रात्री 10 वाजण्याच्या आसपास पोलिसांनी सूरत विमानतळावर एका जोडप्याची झटती घेतली असता हे घबाड हाती लागलं.

कुठून आलंय हे जोडपं?
मिळालेल्या माहितीनुसार, हे जोडपं दुबईहून सूरतला आलं होतं. एअर इंडियाच्या आयएक्स 174 विमानाने दोघेही सूरतमध्ये दाखल झाले. मात्र सूरत विमानतळावर या दोघांच्या चालण्याच्या शैलीबद्दल अघिकाऱ्यांना शंका आली. जोडप्याची चाल संशयास्पद वाटल्याने त्यांना तपासणीसाठी थांबवण्यात आलं. त्यावेळी या दोघांकडे 28 किलो सोनं पेस्ट स्वरुपात आढळून आलं. या सोन्याची किंमत 20 कोटी रुपयांच्या आसपास असल्याचं सांगितलं जात आहे.

…म्हणून या दोघांची झडती घेतली
सीआयएसएफने दिलेल्या माहितीनुसार, दोघांच्या हालाचाली संशयास्पद वाटत होत्या. हे दोघंही खूप विचित्र पद्धतीने चालत होते. त्यामुळे त्यांच्यावर अधिकाऱ्यांना असलेला संशय वाढला. या दोघांनाही ताब्यात घेण्यात आलं आणि त्यांची झडती घेण्यात आली. या झडती दरम्यान, या दोघांनी सोन्याची पेस्ट शरीराच्या विविध भागांमध्ये लपवली होती. दोघांनीही लपवलेल्या सोन्याचं वजन 28 किलो होतं. ज्यातलं 23 किलो सोनं शुद्ध होतं. या प्रकरणी आता सीमा शुल्क विभागाने पुढील चौकशी सुरु केली आहे. या दोघांचीही चौकशी केली जाते आहे. सोनं तस्करीची कुठली टोळी तर कार्यरत नाही ना? याचा शोध आता घेतला जातो आहे, असं ‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तात म्हटलंय.

कोणाला दिलं जाणार होतं हे सोनं?
सीआयएसफने दिलेल्या माहितीनुसार, पकडण्यात आलेल्या सोन्याची किंमत कोट्यवधी रुपये असून सुरुवातीच्या चौकशीत हे सोनं दुबईहून सूरतला आणण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. सूरतमधल्या एका सराफाला हे सोनं दिलं जाणार होतं आणि त्याच्या मार्फत इतर सराफांपर्यंत पोहचवलं जाणार होतं. आता या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येते आहे. सूरत विमानतळावर गेल्या काही महिन्यांपासून अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. त्यामुळे सीआयएसएफ आणि इतर सुरक्षा दलांकडून संशयास्पद हालचालींवर नजर ठेवली जाते आहे. सूरत विमान तळावर जे सोनं पकडलं जाण्याच्या घटना घडल्या आहेत त्यापैकी बहुतांश प्रवासी हे दुबई किंवा शारजाहून परतले आहेत असंही सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या देशांमधून येणाऱ्यांवर विशेष नजर असते.

Related Articles

Back to top button