सात दिवस पावसाचे! मुंबईत रिपरिप, कोकणात मुसळधार; राज्याच्या कोणत्या भागात IMD चा अलर्ट जारी?

राज्यातून मोठ्या विश्रांतीवर गेलेल्या पावसानं टप्प्याटप्प्यानं दमदार आगमन केलं असून आता हाच पाऊस थेट मुंबईतही बरसताना दिसत आहे. अधूमधून असणाऱ्या जोरदार सरी आणि त्यातच मध्ये उसंत घेणारा हा पाऊस कोकणा आणि घाटमाथ्यावरील क्षेत्रामध्ये जोर धरताना दिसत आहे.
कोकणात प्रामुख्यानं रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरील क्षेत्रामध्ये पावसाच्यचा धर्तीवर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, मराठवाडा, विदर्भातही पावसाच्या जोरदार सरींची बरसात होईल असा प्राथमिक अंदाज वर्तवत हवामान विभागानं या भागांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे.
केंद्रीय हवामानशास्त्रानं वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार 21 ते 27 जुलैदरम्यान राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चालू आठवड्यात महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण ओडिशावर चक्राकार परिस्थिती निर्माण होत असून कर्नाटक ते आंध्र प्रदेशपर्यंत एक ट्रफ रेषा हवामानाच्या एकंदर स्थितीवर परिणाम करत आहे. सदर भागांमध्ये पावसासाठी पूरक स्थिती निर्माण होत असल्या कारणानं राज्यात पावसाचा जोर वाढताना दिसत आहे.
कसा सुरू आहे पावसाचा प्रवास?
24 जुलैदरम्यान बंगालच्या उपसागरात उत्तर कमी दाबाचं क्षेत्र नव्यानं तयार होण्याची अपेक्षा असून, परिणामी मध्य महाराष्ट्रातील कोकण आणि घाट भागात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यादरम्यान वादळी वाऱ्यांचीसुद्धा शक्यताना नाकारता येत नसून, वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किमी इतरा राहण्याची शक्यता आहे.
राज्यातील पावसाचा जोर आणखी वाढणार
येत्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार असून, उत्तर महाराष्ट्र किनारपट्टी आणि दक्षिण महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीसाठी सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. दरम्यानच्या काळात वादळी वाऱ्यांचा वेग आणि जोर अधिक राहणार असल्यानं मच्छीमारांना समुद्रात जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे.