शेतात काम करायला गेल्या, थकून दमून जेवायला बसताच काळ आला, नागपुरात वीज पडून दोन महिलांचा मृत्यू, 5 महिला जखमी

एकीकडे पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांची कामं सुरू झाली असताना रामटेक तालुक्यात दुर्दैवी घटना घडलीय. शेतात दिवसभर काम करून थकलेल्या महिलांपैकी काही जणी जेवायला बसल्या, आणि अचानक वीज कोसळली. या घटनेत दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून पाच महिला जखमी झाल्या आहेत. ही घटना गुरुवारी दुपारी मौजा सोनेघाट (ता. रामटेक) येथे घडली.
काम थांबवून जेवायला बसल्या पण मृत्यूनं गाठलं
रमेश जगन्नाथ राहते यांच्या शेतात सुमारे 25 महिला शेतीच्या कामासाठी गेल्या होत्या. दुपारी दोनच्या सुमारास काम थांबवून जेवणासाठी बसल्या असताना अचानक वीज कोसळली. त्यात दोन महिलांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये मंगलाबाई जीवन मोटघरे (रा. परसोडा, ता. रामटेक) आणि वर्षा देवचंद्र हिंगे (रा. भोजापूर, ता. रामटेक) यांचा समावेश आहे. पाच महिला या घटनेत जखमी झाल्या आहेत. त्यामध्ये जयश्री आकाश जवादे, रंजू राजू अष्टेकर, वनिता गजानन नागरीकर (सर्व रा. रामाळेश्वर वॉर्ड, रामटेक), तसेच कलाबाई कवडू वरघणे आणि प्रमिला वासुदेव आष्टनकर (दोघीही रा. भोजापूर, ता. रामटेक) यांचा समावेश आहे. सर्व जखमींना तातडीने रामटेक उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून उपचार सुरू आहेत. रामटेकजवळच्या सोनेघाट येथील रमेश जगन्नाथ राहते यांच्या शेतात अचानक वीज पडल्याने ही घटना घडली. यात या दोघींचा मृत्यू झाला.
ही घटना घडली त्यावेळी परिसरात पावसाचं वातावरण होतं, मात्र वीज कोसळेल असा कोणताही इशारा नव्हता. अचानक आलेल्या या संकटामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तहसीलदार कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.पावसाच्या आधीच वीज पडून दोन महिलांचा मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यांनुसार सावध राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. रामटेकचे तहसीलदार यांनी दिलेल्या माहितीनुसार मौजा सोनेघाट (ता. रामटेक) येथील शेतीत 25 महिला काम करीत होत्या. जेवण करताना दुपारी 2 च्या सुमारास अचानक वीज पडल्याने ही घटना घडली.
नागपूरमध्ये पुष्पा स्टाईलने गांजाची तस्करी
नागपूरमध्ये पुष्पा स्टाईलने गांजाच्या तस्करीचा प्रकार पुढे आला आहे. ट्रकमधील फ्लोवरच्या खाली स्वतंत्र कप्पे करुन 106 किलो गांजा ओडिशा राज्यातून नागपूरमध्ये आणला जात होता. जवळपास 28 लाख रुपये किंमतीचा हा गांजा होता. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नागपूर- हैदरबाद मार्गावर सापळा रचण्यात आला होता. चालक ताजमोहमद शेख व क्लीनर रामलखन गुप्ता याला ताब्यात घेतले आहे. सुरुवातीला आरोपी पोलिसांना सहकार्य करत नव्हते. पोलिसांनी कसून चौकशी केली असता गांजा तस्करीचा नवीन फंडा बघून पोलिस देखील चरकारवून गेले आहेत.