राज्याकडे एकाएकी पावसाची पाठ, कोकणात मात्र भलताच इशारा; सावध होत वाचा सविस्तर हवामान वृत्त

मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागांमधून पावसानं जणू माघारच घेतल्याचं पाहायला मिळत आहे. एखाद दुसरी सर वगळता मुंबई शहरात गेल्या 24 तासांमध्ये पावसाची हजेरी नाही. उलटपक्षी कडाक्याच्या उन्हामुळं नागरिकांनी पावसासाठी आणलेली छत्री चक्क या ऊन्हापासून बचाव करण्यासाठी वापरल्याचंही पाहायला मिळालं. फक्त मुंबईतच नव्हे, तर राज्याच्या बहुतांश भागांमध्ये हेच चित्र असून राज्याच्या कमाल तापमानाचा आकडा 30 अंशांच्याही पलिकडे गेला आहे. त्यामुळं आता हा पाऊस नेमका पुन्हा जोर केव्हा धरणाच याचीच अनेकांना उत्सुकता लागल्याचं पाहायला मिळत आहे.
ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी हवामान विभागाच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार एकिकडे राज्यात पावसाचं प्रमाण कमी झालं असतं तरीही ही विश्रांती फार काळासाठी राहणार नसून, 24 जुलैनंतर राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होण्यास पूरक स्थिती निर्माण होताना दिसेल. प्रामुख्यानं 24 जुलै ते 7 ऑगस्टदरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागातही सरासरीपेक्षा जास्त पावसाचा प्राथमिक अंदाज त्यांनी वर्तवला आहे.
मध्य महाराष्ट्रापासून आंध्र प्रदेशष आणि नजीकच्या भागांमध्ये चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण होताना दिसत आहे. त्यामुळं बंगालच्या उपसागरामध्ये 24 जुलैपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार होऊन परिणामस्वरुप महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होताना दिसणार आहे.
दरम्यान पुढील 24 तासांमध्ये, कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसाचं प्रमाण विदर्भासह राज्यातही तुलनेनं कमी झालं असलं तरीही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींमध्ये सातत्य पाहायला मिळत आहे. पुढील 24 तासांसाठी हवामान विभागाने रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तर, मुंबईसह ठाणे, पालघर भागात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता सांगितली आहे. कोल्हापूर, सातारा घाट क्षेत्रावर मात्र पाऊस मेहेरबान राहणार असून, सांगली आणि सोलापूरतही मुसळधार हवामान विभागानं वर्तवली आहे.