परळीच्या बंगल्यावरून फोन येताच तपास थांबवला; विष प्राशन केलेल्या ज्ञानेश्वरी मुंडेंचा सनसनाटी आरोप, वाल्मिक कराडच्या चौकशीची मागणी
पतीच्या हत्या प्रकरणात न्याय मिळावा या मागणीसाठी परळीतील मृत महादेव मुंडे यांच्या पत्नीने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यावर उपचार सुरू आहेत. ज्ञानेश्वरी मुंडे यांनी परळीच्या बंगल्यावरून फोन आल्याने तपास बंद केल्याचा गंभीर आरोप केला आहे. माझी मुलं बाबांना का मारलं अशी विचारणा करत असून महिनाभरात न्याय न मिळाल्यास जीवन संपवणार असल्याचा इशारा ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिला आहे.
तर माझं जीवन संपवणार
ज्ञानेश्वरी मुंडे बोलताना म्हणाल्या की, पतीच्या हत्येच्या तपासात पोलीस अधीक्षकांसोबत सकारात्मक चर्चा झाली. मात्र केवळ तपास करतो असे उत्तर मिळते. त्यामुळे जीवन ठेवून काय उपयोग? त्यामुळे असा निर्णय घेतल्याचे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सांगितले. आता माझी केवळ एकच मागणी आहे, मला न्याय द्यावा. या महिन्यात न्याय नाही मिळाला, तर माझं जीवन संपवणार आहे हे तपास यंत्रणेने जाणून घेतलं पाहिजे असा गर्भित इशाराही त्यांनी दिला आहे.
परळीच्या बंगल्यावरून फोन आला होता
त्यांनी पुढे सांगितले की, मुलं मला बाबांना का मारलं याची विचारणा करतात. पतीच्या प्रकरणाचा तपास कुणाकडेही द्या मात्र आरोपींना अटक करा, अशी मागणी त्यांनी केली. बंगल्यावरून फोन आल्यानंतर या प्रकरणाचा तपास थांबविण्यात आला असा आरोप ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला. विजयसिंह बांगर यांनी जे सांगितलं त्याची सत्यता पोलीस अधीक्षक तपासत आहेत. तपास थांबवण्यासाठी परळीच्या बंगल्यावरून फोन आला होता. सर्व कारभार वाल्मीक कराड सांभाळत होता, असेही त्यांनी म्हटले आहे. पोलिसांनी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या वाल्मीक कराडचे देखील चौकशी केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. माझ्या पतीसोबत माझं शेवटचं बोलणं झालं त्यावेळी ते हसत खेळत होते तणाव नव्हा. माझ्या मुलांच्या डोक्यातील विचारातून मारेकऱ्यांना मारायचा आहे, हे काढण्यासाठी मला न्याय पाहिजे असल्याचे त्या म्हणाल्या.