दुपारनंतर वादळी वारे! विदर्भ पावसाच्या निशाण्यावर, इतक्यात या माऱ्यापासून सुटका नाही

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं कोसळणाऱ्या पावसानं आता काहीशी उसंत घेतली असून गेल्या 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसानं उघडीप दिली आहे. कोकणातही काही भागांमध्ये वरुणराजा विश्रांतीवर गेला असून, राज्याच्या बहुतांश भागांमध्ये अधूनमधून सूर्यदर्शनही होत आहे. असं असलं तरीही विदर्भात मात्र पावसानं विश्रांती घेतली नसून पूर्व विदर्भाला या मोसमी पावसाचा तडाखा बसणं सुरूच राहणार असल्याचा इशारा देत हवामान विभागानं या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रायगड, चंद्रपूर,पुणे आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर पावसाचा आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून दुपारनंतर वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पूर्व विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार आणि मराठवाड्यातही पावसाच्या तुरळक सरींची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. इथं प्रामुख्यानं नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवणअयात आली आहे, तर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवत हवामान विभागानं नागरिक आणि यंत्रणांना सतर्क केलं आहे. उर्वरित राज्यातून मात्र पावसाचा जोर काही अंशी ओसरल्याचं पाहायला मिळत आहे.
राज्यात का कमी झालं पावसाचं प्रमाण?
मान्सूनला सक्रिय ठेवणारा कमी दाबाचा एक पट्टा निवळला असून, किनारपट्टीवर सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टासुद्धा विरुन जाताना दिसत आहे. ज्यामुळं राज्यातील पावसाचं प्रमाण कमी झाल्याचं निष्पन्न होत आहे. दरम्यान, मान्सूनचा आस असणारा एक कमी दाबाचा पट्टा मात्र राजस्थानपासून बंगालच्या उपसागरात ईशान्येकडे सक्रिय असून अरबी समुद्रातून निघणारा कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरातपासून मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेशचं दक्षिण क्षेत्र, छत्तीसगढ इथपर्यंत सक्रिय असल्यानं विदर्भ आणि मराठवाड्यावर पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.
ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ केएस होसाळीकर यांनी IMDच्या हवाल्यानं दिेल्या माहितीनुसार पुढील 4 ते 5 दिवस विदर्भ आणि कोकणात काही भागांमध्ये तर, घाटमाथ्याच्या काही भागात, मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची आहे. या पावसाच्या सरी राहणार असून जोरदार पाऊस पडण्याची शक्यता फार नाही, तर मुंबई ठाण्यात सामान्यतः अधूनमधून सरींची शक्यता आणि ऊन-पावसाची परिस्थिती पाहायला मिळेल.