24 तासांत ऊन, वारा, पावसाचा मारा… पाहा मुंबई, रायगड, रत्नागिरीपासून विदर्भापर्यंतचं हवामान वृत्त

महाराष्ट्रात एकिकडे उष्णतेचा तडाखा वाढत असतानाच दुसरीकडे मात्र काही भाग यास अपवाद ठरत असून, तिथं मात्र दमट आणि ढगाळ वातावरणानं नेमका कोणता ऋतू सुरू आहे, हाच प्रश्न उभा केला आहे. सध्या देशात बिहारपासून नजीकच्या भागावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून त्यामुळं छत्तीसगडपासून कर्नाटक, तेलंगणा आणि तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. परिणामस्वरुप महाराष्ट्रात प्रामुख्यानं पश्चिम क्षेत्रामध्ये ढगाळ वातावरण आणि काही भागांमध्ये पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे.
गेल्या 24 तासांच कोल्हापुरातील अनेक भागांमध्ये अवकाळीच्या हजेरीसह गारपीटसुद्धा पाहायला मिळाली. पुढील 24 तासांमध्येसुद्धा हीच स्थिती कायम राहणार असून, पश्चिम घाट क्षेत्र, सिंधुदुर्गात पावसाच्या मध्यम स्वरुपातील सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, विदर्भात मात्र होरपळ कायम राहणा असून किंबहुना त्यात आणखी वाढही अपेक्षित असल्याचा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे.
राज्यात सोलापुरात तापमानाचा पारा 44 अंशाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. बुधवारी सोलापुरात 43.8°c इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. यंदाच्या मोसमातील ही सर्वात सर्वोच्च तापमानाची नोंद ठरली. इथं सकाळी 11 ते दुपारी 3 दरम्यानचा अधिक उष्णतेचा काळ असून, कडक उन्हामुळे शहरातील अनेक महत्त्वाचे रस्ते दुपारच्या वेळेत निर्मनुष्य असल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यामुळं नागरिकांनी कडक उन्हापासून काळजी घ्यावी गरज असेल तरच बाहेर पडा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.