अपराध समाचारदेश

झिपलाईन करायला गेली अन् तिथेच जीव गमावला, पुण्याच्या तरुणीचा 30 फूट उंचीवरून कोसळून मृत्यू

 पुण्यातील तरुणीचा झिपलाईन करताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. झिपलाइन करताना 30 फूट उंचीवरुन कोसळून तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना भोर तालुक्यात घडली आहे. तरुणीचे वय अवघे 28 वर्ष असून ती कुटुंबासोबत पिकनिकसाठी वॉटरपार्कला गेली होती. तरल अटपाळकर अस मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी  वॉटरपार्क चालक आणि मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तरल अटपाळकर ही तिच्या कुटुंबासह राजगट वॉटरपार्कमध्ये गेली होती. तिथे असलेल्या झिप लाइन हा खेळ तिच्या जीवावर बेतला. झिपलाईन करण्यासाठी ती 30 फूट उंचीवर गेली. रोपवरून चालत असताना तिने सुरक्षा दोर वरच्या बाजूला रेलिंगला अडकवण्याचा प्रयत्न केला. पण रेलिंगपर्यंत हात न पोचल्याने ती लोखंडी स्टूलवर उभी राहिली मात्र तिचा पाय सटकला आणि ती 30 फूट उंचीवरुन खाली कोसळली. यातच तिचा जागीच मृत्यू झाला आहे. 

या प्रकरणी वॉटरपार्क चालक आणि मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. सोबतच वॉटरपार्कचा निष्काळजीपणादेखील समोर आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे. कुटुंबाच्या डोळ्यादेखत तरुणीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर वॉटरपार्कमधील सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे.

दरम्यान, यापूर्वीदेखील असेच साहसी खेळ तरुणांच्या जीवावर बेतत असल्याच्या घटना घडल्या होत्या. पुण्याचाच एका तरुणीचा गोव्यात पॅराग्लायडिंग करताना मृत्यू झाला होता. पुण्यातील 27 वर्षीय शिवानी दाबले आणि 26 वर्षीय नेपाळी पायलट सुमन नेपाळी या दोघांचा मृत्यू झाला होता. 18 जानेवारी रोजी परनेम केरी येथील क्री पठार परिसरात पॅराग्लायडिंग करण्यासाठी गेली होती. तिथेच शिवानीच्या पॅराशुटचा दोर तुटला. शिवानीचे पॅराशमुट थेट एका दगडावर  कोसळले. यात शिवानीसह तिच्यासोबत असलेला पायलट सुमन नेपाळी यांचा मृत्यू झाला होता.

Related Articles

Back to top button