यंदाचे गणपती दणक्यात; मुंबई-गोवा महामार्गाबाबत गडकरींनीच दिला शब्द, म्हणाले…

दरवर्षी गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांसाठी त्यातही रस्ते मार्गानं कोकण गाठू पाहणाऱ्यांसाठी वाटेत अनेक अडचणी उभ्या असल्याचं पाहायला मिळतं. सर्वात मोठी अडचण असते ती म्हणजे वाहतूक कोंडीची. टप्प्याटप्प्यानं सुरू असणारी आणि रेंगाळलेली मुंबई- गोवा महामार्गाची कामं नेमकी कधी सुरू होणार, हाच प्रश्न अनेकदा अनेकांच्याच डोक्यात घर करत असतो. आता मात्र या प्रश्नाचं खात्रीशीर उत्तर खुद्द केंद्रीय मंत्र्यांनीच दिल्यामुळं कोकणकरांची आणि मुंबई- गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांची चिंता मिटली आहे, असं म्हणणं हरकत नाही.
देशात विविध राज्यांमध्ये विविध महामार्ग, किंबहुना महाराष्ट्रातही मोठमोठे महामार्गांचे प्रकल्प हाती घेत पूर्णत्वास नेण्यात आले, तरीही एका मुंबई गोवा महामार्गाचं काम मात्र ताटकळतच राहिलं. अखेर या वाटेनं जाणाऱ्यांच्या प्रतीक्षेचा अंत झालेला असतानाच केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमादरम्यान या महामार्गाचं काम नेमकं कधी पूर्ण होणार आहे, यासंदर्भातील माहिती देत नागरिकांना शब्दच दिल्याचं पाहायला मिळालं.
‘मुंबई- गोवा महामार्गाच्या कामात भरपूर अडचणी आल्या, हा मार्ग आमच्या विभागातील ब्लॅक स्पॉट होता. मात्र, आता यावर्षी जून अखेरपर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण होईल’, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. दादरच्या अमर हिंद मंडळाच्या वतीनं आयोजित केलेल्या वसंत व्याख्यानमालेत ‘महामार्ग विकासाचा’ या विषयावर ते बोलत होते.
राष्ट्री महामार्ग क्रमांक 66 अर्थात मुंबई- गोवा महामार्गाचं काम कधी पूर्ण होणार हाच प्रश्न सातत्यानं उपस्थित करण्यात येत होता. प्रत्यक्षात या महामार्ग बांधणीमध्ये अनेक अडचणींनी डोकं वर काढलं होतं. तीन एकर जमिनीची पंधराहून अधिक वारसदार असल्यामुळं त्यांच्यातच एकमत नसल्यानं जमिनीचा मोबदला कोणाला जाणार इथपासूनचे प्रश्न होते. आता मात्र या अडचणींवर तोडगा निघाला असून, रस्त्याचं काम अधिक झपाट्यानं पूर्णत्वाच्या दिशेनं जात आहे. ज्यामुळं यंदाचे गणपती या नव्या वाटेमुळं दणक्यात होणार असं म्हणणं गैर ठरणार नाही.
राष्ट्रीय महामार्गांचं जाळं अमेरिकेहून चांगलं असेल…
देशाला विश्वगुरू करण्यासाठी आयात कमी करून निर्यात वाढवावी लागेल. त्यासाठी लॉजिस्टिक कॉस्ट कमी करावी लागेल. चीनमध्ये लॉजिस्टिक कॉस्ट 8 टक्के आहे. युरोपातील देशांत 11 टक्के आहे. त्यामुळे लॉजिस्टिक कॉस्ट सध्याच्या दोन अंकी म्हणजेच जवळपास 16 टक्क्यांवरून 9 टक्क्यांवर येत्या जानेवारीपर्यंत आणली जाईल, असंही ते म्हणाले. गडकरी यांनी पुढील दोन वर्षात नॅशनल हायवेचं रस्ते जाळं अमेरिकेपेक्षा चांगलं होईल, असा आशावाद व्यक्त केला.
टोलसंदर्भातील धोरण
‘एनएचएआय’च्या टोलनाक्यांबाबत पुढील पंधरा दिवसांत नवे धोरण आणले जाणार आहे. त्यातून या टोलनाक्यांबाबत वाहनचालकांची कोणतीही तक्रार राहणार नाही, असं गडकरींनी सांगितलं. तसंच भविष्यात सॅटेलाइट बेस टोलवसुली केली जाणार असून त्यातून नागरिकांना टोलनाक्यांवर थांबावं लागणार नाही, असंही ते म्हणाले.