देश

Varanasi Gang Rape: 22 जणांकडून तरुणीवर बलात्कार! मोदींनी वाराणसीत पोहोचताच विमानतळावर पोलिसांना…

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे 19 वर्षाच्या तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाचा तपशील जाणून घेतला. वेगवेगळ्या विकास कार्यक्रमांच्या उद्घाटनासाठी आपल्या मतदारसंघात पोहोचलेल्या पंतप्रधान मोदींनी या प्रकरणासंदर्भात काही महत्त्वाचे निर्देश दिल्याची माहिती समोर येत आहे. मोदींनी वाराणसी विमानतळावर उतरताच पोलिसांना या प्रकरणात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. 

नऊ आरोपी अटकेत

उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये 19 वर्षाच्या तरुणीचं अपहरण करुन 22 जणांनी तिच्या सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 22 जणांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा दावा पीडित तरुणीने केला आहे. पोलिसांनी आम्ही आतापर्यंत या प्रकरणामध्ये नऊ आरोपींना अटक केली असून, इतरांचा शोध सुरु असल्याची माहिती दिली आहे. 

उत्तर प्रदेश सरकारनेच दिली माहिती

पोलीस आयुक्त, उपायुक्त, जिल्हाधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदींना या प्रकरणासंदर्भातील तपासाची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी या पोलीस अधिकाऱ्यांबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनाही या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा दिली जावी अशा सूचना केल्या. तसेच भविष्यात अशी कोणतीही घटना घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची सूचनाही पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना केली. “पंतप्रधान मोदी वाराणसीमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना पोलीस आयुक्तांनी, उपायुक्तांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी बालत्कार प्रकरणाच्या तपासाचा संपूर्ण तपशील दिला,” असं उत्तर प्रदेश सरकारने जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे.

मोदींनी काय निर्देश दिले?

“पंतप्रधान मोदींनी या प्रकरणातील दोषींविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच भविष्यात अशा गोष्टी घडू नये म्हणून उपाययोजना करण्याचे आदेशही पंतप्रधानांनी दिलेत,” असंही उत्तर प्रदेश सरकारने स्पष्ट केलं आहे. 

नेमकं हे प्रकरण काय?

वाराणसीच्या लालपूर परिसरात वास्तव्यास असणारी पीडित मुलगी 29 मार्च रोजी मित्राच्या घरी जाण्यासाठी निघालेली. याआधीही अनेकदा ती या मित्राच्या घरी गेली होती. पण यावेळी पीडिता मित्राच्या घरी गेल्यानंतर स्वत:च्या घरी परतलीच नाही. 4 एप्रिलला मुलीच्या कुटुंबाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याच दिवशी अपहरणकर्त्यांनी पीडित मुलीची सुटका केली. या मुलीला अंमली पदार्थांचा डोस देण्यात आला होता. पीडितेला पांडेपूर अपहरणकर्त्यांनी चौकात सोडलं होतं. पीडितेने तिथून एका मित्राचं घर गाठलं. तिथून तिला तिच्या घरी नेण्यात आलं. नंतर तिने तिच्या वडिलांना या घटनेची माहिती सांगितली. पीडितेच्या वडिलांनीच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडितेच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार हुक्का बार, हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाऊस अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. यादरम्यान लैंगिक अत्याचारात अनेक लोक सहभागी झाले होते. माझ्यावर एकूण 22 जणांनी बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर पोलिसांनी हुकुलगंज आणि लल्लापुरा भागातील 9 जणांना ताब्यात घेतलं असून इतर फरार आरोपींनाही लवकरच अटक केली जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Back to top button