‘जय जिजाऊ, जय शिवराय…’ म्हणत विकी कौशलची मोठी घोषणा; मराठीत म्हणाला, ‘शिवजयंती…’

महाराष्ट्रासहीत संपूर्ण भारताचे श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आज 395 वी जयंती आहे. महाराष्ट्रातील वेगवगेळ्या भागांमध्ये 18 फेब्रुवारीच्या सायंकाळपासूनच शिवरायांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा होताना दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीवर आज 395 व्या शिवजयंतीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित सकाळी 8 वाजता शासकीय शिवजयंती जन्मोत्सव सोहळा संपन्न होणार आहे.
रायगडावर मोठा सोहळा
सकाळी 7 वाजता पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शिवनेरीवर शिवाई देवीची महापूजा पार पडली. या महापुजेनंतर पालखीने शिवजन्मस्थळाकडे प्रस्थान केलं. शिवजयंतीनिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवभक्त किल्ले शिवनेरीवर महाराजांच्या जन्मस्थळाकडे नतमस्तक होण्यासाठी दाखल होत आहेत. शिवसेरीबरोबर रायगडावरही मोठ्या उत्साहामध्ये शिवजयंती साजरी केली जात आहे. रायगडवरील शिवजयंती उत्सवामध्ये प्रमुख पाहुणा म्हणून अभिनेता विकी कौशल सहभागी होत आहे. स्वत: विकीने यासंदर्भातील माहिती इन्स्टाग्राम स्टोरीमधून दिली आहे.
अजित पवारांच्या पक्षाकडून विशेष कार्यक्रम
शिवजयंतीचे औचित्य साधून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वराज्य सप्ताह कार्यक्रमाची सुरुवात किल्ले रायगडावरून होत आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालणाऱ्या ‘छावा’ चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशल या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. किल्ले रायगडावर शिवजयंती उत्सव साजरा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे किल्ले रायगड स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. मंत्री आदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम राबवला जाणार आहे.
काय म्हणाला विकी?
विकीने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये अगदी मराठीमध्ये ही घोषणा केली आहे. मंगळवारी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये विकीने, “नमस्कार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ती उद्या मी विकी कौशल स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडवर येत आहे. आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा आशिर्वाद घेऊ. त्यांना नमन करुन त्यांचा आशिर्वाद घेऊन शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी करुयात,” असं म्हटलं आहे. व्हिडीओच्या शेवटी हात जोडत विकीने, ‘जय जिजाऊ, जय शिवराय’ असंही म्हटलं आहे.
‘छावा’ची दमदार कमाई
दरम्यान, विकीने छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित ‘छावा’ चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली असून हा चित्रपट तिकीटबारीवर बक्कळ कमाई करत असल्याचं दिसत आहे. पहिल्या चार दिवसांमध्ये या चित्रपटाने 170 कोटींहून अधिक कमाई केली असून यंदाच्या वर्षातील हा सर्वात यशस्वी चित्रपट ठरला आहे.