Accident : बस आणि ट्रकच्या भीषण धडकेत बसमध्ये आग भडकली; तब्बल 41 जण जिवंत जळाले, मृतांची ओळख पटेना

बस आणि ट्रकची समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत बसने पेट घेतला. यानंतर लागलेल्या भीषण आगीमध्ये बसमधील 48 जणांपैकी 38 प्रवासी आणि दोन्ही चालकांचा मृत्यू झाला, तर ट्रक चालकाचाही अपघातात मृत्यू झाला. भीषण धडक होताच बसने लगेच पेट घेतला आणि प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. अपघातानंतर बस पूर्णपणे जळून खाक झाली. यानंतर बसचा फक्त सांगाडा शिल्लक राहिला. आतापर्यंत फक्त 18 जणांची ओळख पटली आहे. बचावकार्य अजूनही सुरू आहे. ही घटना मेक्सिकोच्या ताबास्को राज्यात घडली. बस ऑपरेटर कंपनी टूर्स अकोस्टा यांनी सोशल मीडियावर अपघाताबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. बस वेगमर्यादेत होती की नाही हे ठरवण्यासाठी ते अपघाताची चौकशी करण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत काम करत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
यापूर्वीही अपघात झाले आहेत
मेक्सिकोमध्ये असा अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही बस आणि ट्रकच्या धडकेत 19 जणांचा मृत्यू झाला होता. 2020 पासून मेक्सिकोमध्ये रस्ते अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. 2022 मध्ये 381,048 अपघात झाले, ज्यामध्ये 4803 लोकांचा मृत्यू झाला आणि 90 हजारांहून अधिक लोक जखमी झाले. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये भारतातील जयपूर शहरात अशीच एक घटना घडली होती, ज्यामध्ये दोन ट्रकला आग लागली होती. तेलाने भरलेल्या कंटेनरला आग लागल्याने मोठा स्फोटही झाला. या अपघातात सुमारे 40 जण गंभीररित्या भाजले. तसेच 5 जणांचा मृत्यू झाला.