देश

Anjali Damania : बीडमध्ये दादागिरी आणि जमिनी लाटण्याचं काम, मुंडेंनी त्यांच्या मामींचीही जमीन लाटली; अंजली दमानियांचा धनंजय मुंडेंवर वार

धनंजय मुंडे यांनी जर कृषी खात्याचे मंत्री म्हणून काम केलं असतं तर त्यांना खात्यात काय सुरू आहे याची माहिती असती. पण त्यांनी बीडमध्ये दादागिरी आणि जमिनी लाटण्याचं काम केलं. त्यांनी त्यांच्या मामींच्या जमीनही लाटली असल्याचा जोरदार टोला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी लगावला. धनंजय मुंडे यांनी भ्रष्टाचार केला याचा पुनरूच्चारही दमानिया यांनी केला. आपण बदनाम लोकांच्या विरोधात पुरावे देत असल्याने काहीही म्हणा असंही त्या म्हणाल्या. धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया यांनी केलेले आरोप फेटाळले होते आणि त्यांना बदनामिया असं म्हटलं होतं. त्याला दमानिया यांनी प्रत्युत्तर दिलं. 

अंजली दमानिया यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या टीकेला मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले होते. आपल्यावरील सर्व आरोप फेटाळत त्यांनी दमानिया यांना बदनामिया असं म्हटलं होतं. दमानियांनी केलेले आरोप केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी असल्याचं मुंडेंनी म्हटलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना अंजली दमानिया म्हणाल्या की, मी धनंजय मुंडे यांची जागा दाखवली. त्यांनी मला बदनामिया म्हटलं, पण त्यांनी मला पुराविया म्हटलं पाहिजे होतं. 

मंत्री म्हणून काम केलं असतं तर…

मुंडेंनी घोटाळा केल्याचा अंजली दमानिया यांनी पुनरुच्चार केला. त्यावेळी कृषी आयुक्तांच्या अहवालाचा अंजली दमानिया याच्याकडून दाखला देण्यात आला. त्या म्हणाल्या की, मंत्री म्हणून धनंजय मुंडे यांनी जर वेळ दिला असता तर त्यांना सगळं कळलं असतं. पण यांनी बीडमध्ये जाऊन दहशत पसरवली. त्यांनी जमिनी लाटण्याचं काम केलं. त्यांनी आपल्या मामींचीही जमीन बळकावली.

काय म्हणाले होते धनंजय मुंडे? 

कृषी विभागातील वस्तुंची खरेदी निविदा प्रक्रिया नियमांना धरुनच असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं.अंजली दमानियांचे आरोप सनसनाटी निर्माण करणारे आणि धादांत खोटे असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले. हे सगळं केवळ बदनामीसाठी सुरु आहे. दमानियांनी  खोटं बोलणं थांबवावं असंही ते म्हणाले. 

कृषी विभागातील खरेदी किंमत दमानियांना विचारून सरकारने ठरवायची का? असा सवाल धनंजय मुंडेंनी केला. अंजलीताईंनी केलेला एकतरी आरोप कुठेतरी टिकलाय का? दमानियांच्या बुद्धीची कीव करावी का? असाही खोचक सवालही धनंजय मुंडे यांनी विचारला.

अंजली दमानिया यांनी केलेले आरोप 

अंजली दमानिया यांनी तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडेंवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. नॅनो युरिआ, नॅनो डीएपीसह 5 वस्तू खरेदीत मुंडेंनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे.  नॅनो युरिआची 500 मिलीमीटरची बाटली 92 रुपयांना मिळते. पण धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली हीच बॉटल  220 रुपयांना खरेदी करण्याचे टेंडर काढण्यात आले. त्यावेळी कृषी खात्याने 19 लाख 68 हजार 408 बाटल्या खरेदी केल्या. तर नॅनो डीएपची 269 रुपयांची एक बाटली  590 रुपयांना खरेदी करण्यात आली. तर बॅटरी स्प्रेअरचा बाजारभाव 2496 रुपये असताना कृषी खात्याने एक स्प्रेअर 3425 रुपयांना विकत घेण्यात आला. या माध्यमातून प्रचंड मोठा आर्थिक घोटाळा करण्यात आल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला.

Related Articles

Back to top button