आजपासून मुंबईकरांचा प्रवास महागणार; रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ, वाचा नवे दर
आजपासून मुंबईकरांचा प्रवास महागणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील मीटर ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात 3 रुपयांची वाढ झाली आहे. तर, कुल कॅबच्या दरात 8 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळं मुंबईकरांना आजपासून अधिक आर्थिक भार सोसावा लागणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाच्या (एमएमआरटीए) झालेल्या बैठकीत टॅक्सी आणि ऑटो रिक्षांच्या भाड्यात वाढ करण्याची मान्यता देण्यात आली होती. त्यामुळे आज १ फेब्रुवारीपासून नवीन भाडे वाढ लागू होणार आहे. नव्या दरानुसार भाडेवाढ करण्यासाठी मीटरमध्ये फेरबदल करण्याची मुदत एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत असून तोपर्यंत सुधारित भाडे आकारणीचा चार्ट देण्यात आला आहे.
प्रस्तावित दरानुसार रिक्षाचे भाडे ११ टक्के आणि टॅक्सीचे भाडे १० टक्के वाढले आहे. तसेच कूल कॅबच्या भाड्यातही २० टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
अशी आहे भाडेवाढ
– काळी-पिवळी मीटर टॅक्सीसाठी (सीएनजी) पूर्वीचे प्रति कि.मी. रुपये 18.66 वरून रुपये 20.66 भाडेदर सुधारणा करण्यात आली. आता काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) साठी किमान देय प्रति 1.5 कि.मी. भाडे रूपये 28 वरून रुपये 31 भाडेदर असणार आहे.
– कुल कॅबसाठी पूर्वीचे प्रति कि.मी. भाडे रुपये 26.71 वरून रुपये 37.2 (20 टक्के वाढीप्रमाणे) भाडेदर सुधारणा करण्यात आली. आता कुल कॅबसाठी किमान देय प्रति 1.5 कि.मी. भाडे रुपये 40 वरून रुपये 48 रुपये भाडेदर असणार आहे.
– ऑटोरिक्षासाठी (सीएनजी) पूर्वीचे प्रति कि.मी. भाडे रुपये 15.33 वरून रुपये 17.14 रुपये भाडेदर सुधारणा करण्यात आली. आता ऑटोरिक्षा (सीएनजी) साठी किमान देय प्रति 1.5 कि.मी. भाडे रूपये 23 वरून रूपये 26 रुपये भाडेदर असणार आहे.
सदर भाडेदर सुधारणा मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण क्षेत्रातील सर्व काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) व ऑटोरिक्षा (सीएनजी) यांना लागू राहील. 1 फेब्रुवारीपासून नवीन दर लागू होतील.
लालपरीचा प्रवासही महागला
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडलाने वाहतूक सेवांच्या भाडेदरात 14.95 टक्के वाढ करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार 25 जानेवारीपासूनच एसटीचा प्रवास महागला आहे. साध्या बसचे सध्याचे भाडे 8.70 रुपये होते, ते आता 11 रुपये असेल. जलद सेवा (साधारण) आणि रात्र सेवा (साधारण बस) याचंही भाडं सारखंच असेल. निम आरामसाठी 11.85 रुपयांऐवजी 15 रुपये मोजावे लागतील.