कल्याण हत्या प्रकरण: फडणवीस Action मोडमध्ये! पोलीस आयुक्तांना फोनवरुन आदेश; म्हणाले, ‘आरोपीला..’

कल्याण पूर्वेतील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार करुन तिची हत्या केल्याप्रकरणी मुख्य आरोपी विशाल गवळीला पोलिसांनी बुधवारी अटक केली असून या प्रकरणात नवे खुलासे समोर येत आहेत. असं असतानाच राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. फडणवीस यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरेंशी फोनवरुन संवाद साधत काही निर्देश दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं?
मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाणे पोलीस आयुक्त डुंबरे यांच्याशी चर्चा करताना कल्याणमध्ये घडलेली घटना फारच गंभीर असल्याचं म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी, “विकृतांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे”, असंही म्हटलं आहे. तसेच आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आल्याबद्दल गृहमंत्र्यांनी समाधान व्यक्त करताना पुढील खटला हा जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा असे निर्देश दिले आहेत. “हा खटला जलदगती न्यायालयात चालवा,” असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याची माहिती मिळाली आहे. “आरोपीला फाशी होईल, हे सुनिश्चित करा,” असे आदेशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत.
घरात केला बलात्कार
अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन आरोपी विशाल गवळी तिला घरी घेऊन गेला. तिथेच त्याने तिच्यावर बलात्कार केला. यासंदर्भातील वाच्यता तिने कुठेही करु नये म्हणून त्याने मुलीची हत्या केली. त्यानंतर घरातील एका बॅगेत मृतदेह भरुन ठेवला. सायंकाळी पत्नी घरी आली तेव्हा त्याने पत्नीला सर्व घटनाक्रम सांगितला. पती आताच तुरुंगाबाहेर तो पुन्हा तुरुंगात जाऊ नये म्हणून पत्नी साक्षीनेच मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.
बदलापूरच्या आरोपीप्रमाणे कठोर कारवाई करा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार सुलभा गायकवाड यांनी यापूर्वीच बदलापूरप्रमाणे कल्याणच्या आरोपीवर देखील कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणातील अक्षय शिंदे याच्यावर कठोर कारवाई करण्यात आलेली. त्याची देखील तीन लग्नं झाली होती. कल्याणमध्ये देखील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली आहे. या नराधमाची तीन लग्नं झाली आहेत अशा नराधमावर देखील कठोरात कठोर कारवाई करावी असं सुलभा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती करताना म्हटलं आहे.
स्थानिकांचा आक्रोष
कल्याण अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील तपशील समोर आल्यानंतर या घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी निषेध मोर्चा काढला. मुलीच्या घरापासून हा मोर्चा काढण्यात आला. देशात आणखी किती निर्भया होणार आहेत? कधी थांबणार महिलांची अवहेलना? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणामध्ये आरोपीला सुरक्षेच्या कारणाने सध्या ठाणे शहरातील नौपाडा पोलीस स्थानकामध्ये ठेवण्यात आलं आहे. आरोपीला आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे.