शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या खास माणसाला पोलिसांनी मुंबई विमानळावरुन उचललं

शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर कालपासून व्हायरल होत आहे. याप्रकरणात मुंबई पोलिसांनी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय साईनाथ दुर्गे यांना अटक केली आहे. साईनाथ दुर्गे हे मुंबईबाहेर होते. सोमवारी सकाळी ते मुंबई विमानतळावर येताच दहिसर पोलिसांनी साईनाथ दुर्गे यांना ताब्यात घेतले. त्यामुळे आता याप्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, ‘मातोश्री’ या फेसबुक पेजवरुन शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा रोड शोमधील एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांच्या मुलाने याविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. पोलिसांनी रविवारी रात्री कल्याणमधून विनायक डायरे या तरुणाला ताब्यात घेतले होते. यानंतर आता साईनाथ दुर्गे यांना अटक करण्यात आली आहे.
साईनाथ दुर्गे हे आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जातात. साईनाथ दुर्गे युवासेनेच्या कार्यकारिणीचे सदस्य होते. याशिवाय, त्यांनी मुंबई महानगरपालिकेतील शिक्षण समितीमध्येही काम केले आहे. मातोश्री या फेसबुक पेजवरुन शीतल म्हात्रे यांचा व्हिडिओ व्हायरल करण्यात त्यांचा सहभाग असल्याचा संशय आहे. त्यामुळे आता पोलीस चौकशीत साईनाथ दुर्गे काय जबाब नोंदवणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. साईनाथ दुर्गे हे सध्या दहिसर पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलिसांकडून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. आतापर्यंत याप्रकरणात चार ते पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनी ठाकरे गटाविरोधात रान उठवले आहे. शीतल म्हात्रे यांनी आपला व्हिडिओ मॉर्फ करण्यात आल्याचा दावा करत पोलिसांत धाव घेतली. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी शीतल म्हात्रे यांना खडे बोल सुनावले होते. शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओशी आमचा कोणताही संबंध नाही. तुमची पापं लपवण्यासाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर हात टाकत असाल तर हे कायद्याला धरुन नाही. हा व्हिडिओ खरा आहे किंवा खोटा आहे, याचा तपास करावा. व्हिडिओ खरा असल्यास सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी शीतल म्हात्रे यांच्यावरच गुन्हा दाखल करावा, असे संजय राऊत यांनी म्हटले.
व्हिडिओमुळे माझ्या वडिलांची बदनामी होतेय: राज सुर्वे
प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांनी सोमवारी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. राजकीय हेतूने माझ्या वडिलांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचदृष्टीने मॉर्फ केलेला व्हिडीओ व्हायरल केला जात आहे. राजकीय वैमनस्यातून हा सगळा प्रकार सुरु आहे. संबंधित आरोपींविरोधात लवकरात लवकर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करावी, अशी मागणी राज सुर्वे यांनी केली.