Swikriti Sharma : ठाकरेंकडून विधानसभा लढलेल्या प्रदीप शर्मांची पत्नी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत, शेकडो गाड्यांसह जोरदार शक्तिप्रदर्शन

एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांच्या (Pradeep Sharma) नंतर आता त्यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा (Swikriti Sharma) या राजकारणात प्रवेश करणार असून मलबार हिल परिसरात त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे. स्वीकृती शर्मा या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. स्वीकृती शर्मा यांच्या ताफ्यात 50 गाड्या, 25 बसेस आणि 100 हून जास्त बाईक्सचा समावेश आहे.
मुंबई पोलीस दलातील (Mumbai Police) वादग्रस्त माजी पोलिस अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशलिस्ट यांनी 2019 साली उद्धव ठाकरेंकडून नालासोपारा विधानसभेची निवडणूक लढवली होती. हितेंद्र ठाकूर यांच्याविरोधात प्रदीप शर्मा यांनी निवडणूक लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर ॲंटिलिया प्रकरणात प्रदीप शर्मांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.
प्रदीप शर्मांच्या नंतर आता त्यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा या राजकारणात एन्ट्री करणार असून त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे. कार्यकर्त्यांसह त्यांच्या गाड्यांचा ताफा मलबार हिलमध्ये पोहोचल्यानंतर वाहतुकीवर मोठा परिणाम झाला.
अंधेरी पूर्वमधून निवडणुकीच्या रिंगणात?
प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा या आगामी 2024 विधानसभा निवडणुकीत अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे. प्रदीप शर्मा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्या पत्नीचे तिकीट हे निश्चित असल्याचं सांगितलं जातंय. मात्र स्वीकृती शर्मा या नेमक्या कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार हे मात्र अद्याप स्पष्ट झालं नाही.