देश

Electric Scooter Blast: घरात चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरचा स्फोट! 5 जण थोडक्यात बचावले; फ्रिज, TV जळून खाक

इलेक्ट्रीक वाहनं (Electric Vehicles) आज सहज रस्त्यांवर दिसतात. हिरव्या नंबर प्लेटमधील या पर्यावरणपुरक गाड्यांना मागील काही काळापासून चांगलीच मागणी असल्याचं वाहन बाजारपेठेकडे पाहिल्यास दिसून येईल. मात्र या वाहनांची किंमत लोकांच्या आवाक्यात यावी म्हणून त्यांच्या सुरक्षेशी तडजोड तर केली जात नाही ना अशी शंका उपस्थित करण्यासारख्या घटना अनेकदा घडताना दिसतात. अनेकदा या इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये अचानक स्फोट होतो किंवा त्यांना आग लागते. असाच एक प्रकार सोमवारी कर्नाटकमधील मांडया जिल्ह्यात घडला आहे. येथे घरासमोर उभी असलेली एका इलेक्ट्रिक गाडी अचानक बॉम्बस्फोट झाल्याप्रमाणे फुटली. या दुर्घटनेमध्ये घरातील 5 व्यक्ती थोडक्यात बचावल्या. मात्र या दुर्घटनेमध्ये घरातील सर्व सामना जळून खाक झालं आहे.

नेमकं घडलं काय?
मांडया जिल्ह्यामधील मद्दूर तालुक्यामधील वालागेरेहल्ली गावामधील रहिवाशी असलेल्या मुथुराजच्या घरात घडली. मुथुराजने दिलेल्या माहितीनुसार, ही स्कूटर मांड्यामधील रुट इलेक्ट्रिक कंपनीमधील शोरुममधून 6 महिन्यांपूर्वी 85 हजार रुपयांना विकत घेतली होती. सोमवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास मुथुराजने नेहमीप्रमाणे स्कूटर चार्जिंगला लावली. चार्जिंग पॉइंटमध्ये चार्जिंग कॉड लावून वीज पुरवठा सुरु केल्यानंतर मिनिटभराच्या आत अचानक गाडीमधील बॅटरीचा स्फोट झाला. या स्फोट एवढा भीषण होता की संपूर्ण स्कूटरला आग लागली.

घरात होते 5 जण
गाडीच्या बॅटरीच्या स्फोटाचा बॉम्बस्फोटाप्रमाणे आवाज झाल्याने घरात त्यावेळी असलेल्या 5 ही व्यक्ती घाबरल्या. आग लागल्याचं पाहून घरातील लोकांनी आहे त्या अवस्थेत घराबाहेर पळ काढला. नशिबाने आमच्यापैकी कोणही या गाडीचा स्फोट झाला तेव्हा तिच्याजवळ नव्हतो, असं मुथुराजने सांगितलं. हा स्फोट इतका भीषण होता की यामध्ये एखाद्या व्यक्तीचा प्राणही गेला असता.

बरंच सामान जळून खाक
मथुराज यांनी दिलेल्या माहितीनुसार घरातील व्यक्तींनी या गाडीला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. या गाडीला लागलेली आग वाढत गेली आणि घरातील टीव्ही, फ्रिज, डायनिंग टेबल, मोबाइल फोन आणि इतरही बरेच महागडे सामना जळून खाक झाले. घराचे दरवाजे आणि खिडक्यांचंही फार नुकसान झालं आहे.

Related Articles

Back to top button