देश

Kiran Samant: ऐन मतदानाच्या दिवशी किरण सामंत नॉट रिचेबल, भाजप-शिंदे गटाची धाकधूक वाढली, चर्चांना उधाण

कोकणातील लक्षवेधी लढत असणाऱ्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. या मतदारसंघात ठाकरे गटाचे विनायक राऊत आणि भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) रिंगणात आहेत. नारायण राणे यांनी आज सकाळीच मतदानाचा हक्क बजावत रत्नागिरी-सिंधुदुर्गातून मोठ्या विजयाचा दावा केला. मात्र, त्याचवेळी एका गोष्टीमुळे रत्नागिरी-सिंधुदुर्गात महायुतीची धाकधूक वाढली आहे. आज सकाळपासून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत (Kiran Samant) हे नॉट रिचेबल आहेत.

किरण सामंत यांचे कार्यकर्ते हे सकाळपासून त्यांना फोन लावत आहेत. मात्र, अद्याप कोणाचाही किरण सामंत यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. किरण सामंत हे रत्नागिरी-सिंधुदुर्गातून निवडणूक लढण्यासाठी इच्छूक होते. त्यासाठी सामंत बंधूंनी शेवटच्या क्षणापर्यंत किल्ला लढवला होता. मात्र, शेवटी देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांच्या पारड्यात दान टाकल्याने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची उमेदवारी त्यांना मिळाली होती. यानंतर किरण सामंत आणि उदय सामंत महायुतीचा धर्म पाळत कामाला लागले होते. परंतु, आता सर्वकाही सुरळीत सुरु असताना ऐन मतदानाच्या दिवशीच किरण सामंत नॉट रिचेबल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे सध्या भाजप आणि शिंदे गटाच्या गोटातील धाकधूक वाढली आहे.

रत्नागिरीत सामंत बंधुंची ताकद राणेंसाठी महत्त्वाचे
नारायण राणे हे भाजपचे उमेदवार असल्याने त्यांच्या पाठीशी पक्षाची अजस्त्र यंत्रणा आहे. याशिवाय, सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे यांचे वर्चस्व आहे, असे म्हटल्यास अगदीच वावगे ठरणार नाही. परंतु, रत्नागिरी जिल्ह्यात राणेंची ताकद कमी पडते. याठिकाणी उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांचे वर्चस्व आहे. गेल्या अनेक वर्षांपासून किरण सामंत हे उदय सामंत यांच्यासाठी निवडणुकीच्या काळात जबाबदारी सांभाळत आहेत. उदय सामंत हे मंत्री असल्यामुळे सातत्याने मुंबईत किंवा फिरतीवर असतात. या काळात रत्नागिरीत त्यांच्या कार्यकर्त्यांशी किरण सामंत हे संपर्कात असतात. त्यामुळे किरण सामंत यांच्या पाठीशी कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. अनेकवर्षे उदय सामंत यांच्यासाठी निवडणुकीची यंत्रणा राबवण्याचा किरण सामंत यांना अनुभव आहे. त्यामुळे किरण सामंत यांच्या एका भूमिकेने रत्नागिरीतील राजकीय समीकरणं आणि मतदानाचा पॅटर्न 180 अंशाच्या कोनात फिरू शकतो.

याच गोष्टीमुळे किरण सामंत हे नॉट रिचेबल असणे, ही गोष्ट महायुतीची चिंता वाढवणारी आहे. किरण सामंत हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक होते. त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची भेटही घेतली होती. सामंत बंधू हे नारायण राणेंच्या उमेदवारीसाठी राजी नव्हते तोपर्यंत रत्नागिरीत राणे यांच्या बैठका आणि सभांना शून्य प्रतिसाद मिळत होता. अखेर किरण सामंत यांनी मनधरणी केल्यानंतर नारायण राणे यांच्या प्रचाराचा गाडा सुरळीत झाला होता. परंतु, आता ऐन मतदानाच्या दिवशी किरण सामंत यांच्या नॉट रिचेबल होण्याचा नेमका अर्थ काय,याविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Related Articles

Back to top button