पैसे ऑनलाइन ट्रान्सफर करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, IMPS च्या नियमात बदल

गल्लीत येणारा भाजी विक्रेता असू किंवा मॉलमध्ये खरेदी असू ग्राहक आता कुठेही ऑनलाईन पैशांचे व्यवहार करत असतो. जर तुम्ही पण ऑनलाईन पैशांचे व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण आता तुम्ही फक्त 1 किंवा 2 लाख रुपये नाही तर 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम ऑनलाइन सहज पाठवू शकता. यासाठी तुम्हाला IMPS (इमीडिएट पेमेंट सर्विस) चा वापर करावा लागला आहे. त्यासाठी तुमच्या फोन बँकिंग किंवा नेट बँकिंगशी जोडावं लागेल. तुम्हाला ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत त्याचे नाव आणि मोबाईल नंबर तुमच्याकडे असेल तर तुमचे काम सोपे देखील होऊ शकतं.
सध्या IMPS ने मोठी रक्कम पाठवण्यासाठी लाभार्थीचे नाव, बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड टाकणे आवश्यक आहे. या प्रक्रियेला थोडा वेळ लागतो. परंतु नवीन नियम लागू झाल्यानंतर तुम्हाला एवढी मोठी प्रक्रिया करावी लागणार नाही. यासाठी तुम्ही बँक खात्यात नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि नावाद्वारे 5 लाख रुपयांपर्यंतचे ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करु शकता.
1 फेब्रुवारीपासून IMPS च्या नियमात बदल
यासाठी NPCI ने 31 ऑक्टोबर रोजी परिपत्रक जारी केले असून 1 फेब्रुवारीपासून IMPS चे नियमही बदलले जाणार आहेत. या आधारावर कोणतीही व्यक्ती, त्याचे नाव काहीही असो, कोणत्याही लाभार्थीला 5 लाख रुपयांपर्यंतचा निधी हस्तांतरित करू शकतो. सध्या लाभार्थी तपशील जोडले जात नाही तोपर्यंत निधी हस्तांतरित केला जाऊ शकत नाही.