देश

सर्वात लांब बोगदा! पनवेल-कर्जत रेल्वे मार्गाला हिरवा कंदिल; लोकलची गर्दी कमी होणार

मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर पनवेल- कर्जत रेल्वे मार्गातील अडथळा दूर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता प्रवास आणखी सोप्पा होणार आहे. ही रेल्वे मार्गिका सुरू झाल्यामुळं प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे. तसंच, पनवेलहून थेट कर्जतला जाता येणार आहे. आता या मार्गातील अडथळा दूर झाल्याने रेल्वेने पुन्हा काम सुरू केले आहे.

पनवेल-कर्जत मार्गावरील लोकलच्या मार्गाला उच्च न्यायालयाने हिरवा कंदिल दाखवला आहे. या मार्गावर लोकलसाठी दोन नवीन रूळ टाकले जात आहे. पण रेल्वे रूळांमुळं खालापूर येथील एका शाळेला धोका होण्याची शक्यता होती. त्यामुळं या शाळेने कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्या. बी.पी. कुलाबावाला व न्या. सोमेश्वर सुंदरसेन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. रेल्वे अधिकारी आणि शाळा प्रशासनाने संयुक्तपणे जागेची पाहणी केली. शाळेजवळ रेल्वे ट्रॅक कशापद्धतीने बांधता येईल, याचा एक आराखडा रेल्वेने सादर केला आहे. त्यानुसार येथे दहा फूट उंच भिंत उभारली जात आहे, असा दावा रेल्वेने केला आहे. रेल्वेने दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून शाळेने संमती दिली आहे. त्यानंतर कोर्टाने शाळेची याचिका निकालात काढली आहे. तसंच, रेल्वे रुळांचे काम वेगाने सुरू करण्यात यावे, असे आदेश रेल्वे अधिकाऱ्यांना दिले आहेत.

पनवेल-कर्जत ही रेल्वे मार्गिका 2025 पर्यंत तयार होण्याची शक्यता आहे. या रेल्वे मार्गिकेमुळं रायगड जिल्ह्याचा विकास होणार आहे. सध्या पनवेल ते कर्जत दरम्यान एकच मार्गिका आहे. पण या मार्गिकेवर प्रामुख्याने मालगाड्या आणि लांब पल्ल्याच्या गाड्या चालवल्या जातात. डिसेंबर 2016 मध्ये या नव्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती. ही मार्गिका सुरू झाल्यानंतर पनवेलहून कर्जतला थेट जाता येणार आहे. त्यामुळं अर्ध्या तासांचा वेळही वाचणार आहे.

Related Articles

Back to top button