Parliament Winter Session: मोठी बातमी : सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंसह 49 खासदार निलंबित, आतापर्यंत 141 खासदारांचं निलंबन!

लोकसभेच्या (Maharashtra Parliament Winter Session) खासदारांच्या निलंबनाचं (MP Suspension) सत्र आजही सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. कालच्या निलंबनावरुन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना घेरलं होतं. अशातच आजही आणखी 49 खासदारांचं निलंबन लोकसभा अध्यक्षांकडून करण्यात आलं आहे. आज निलंबित झालेल्या खासदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अमोल कोल्हे (Amol Kolhe) निलंबित करण्यात आलं आहे. तर, लोकसभा (Loksabha) आणि राज्यसभा (Rajyasabha) अशा दोन्ही सभागृहातून आतापर्यंत 141 खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे.
संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन घेरलं. संसदेच्या सुरक्षेबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्याची मागणी करत विरोधकांनी गोंधळ सुरू केला. लोकसभेत अध्यक्षांचा अपमान करणाऱ्या अनेक खासदारांना आज पुन्हा निलंबित करण्यात आलं आहे. यामध्ये काँग्रेस खासदार शशी थरूर, सपा खासदार डिंपल यादव आणि महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या नावांचा समावेश आहे.
आज 41 खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय आठ राज्यसभा खासदारांनाही निलंबित करण्यात आलं आहे. यासोबतच आतापर्यंत दोन्ही सभागृहातील 141 खासदारांवर कारवाई करण्यात आली आहे. 18 डिसेंबरपर्यंत एकूण 92 खासदारांचं निलंबन करण्यात आलं होतं.
आज कोणत्या खासदारांचं निलंबन?
सुप्रिया सुळे
अमोल कोल्हे
मनीष तिवारी
शशी थरूर
मोहम्मद फैसल
कार्ती चिदंबरम
सुदीप बंदोपाध्याय
डिंपल यादव
दानिश अली
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
लोकसभेतून निलंबित झाल्यानंतर एबीपी माझाला सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्या म्हणाल्या की, “लोकशाहीच्या मार्गानं आम्ही निवडून आलोय. पण दडपशाही सुरु झाली. आतापर्यंत 100 पेक्षा जास्त खासदार निलंबीत झाले आहेत, संसदेत हल्ला झाला, त्यासंदर्भात आम्ही चर्चेची मागणी केली. पण प्रश्न विचारणारे बाहेर आहेत.”
“सत्ताधाऱ्यांना विरोधक नको आहेत, त्यामुळे निलबंनाची कारवाई करण्यात आली. आमचं सरकार होतं, त्यावेळी आम्ही कधीचं असं केले नाही. देशाच्या गृहमंत्र्यांनी येऊन संसदेत झालेल्या हल्ल्यासंदर्भात निवेदन द्यावे, त्यावर चर्चा व्हायला हवी आहे. पण सरकारला चर्चा करायची नाही, दडपशाही सुरू आहे.”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच, लोकशाहीसाठी आजचा दिवस काळा, लोकशाहीचा आवाज दाबण्याचं पाप आज दिल्लीमध्ये होतंय. विरोधी पक्षाला हद्दपार करण्याचा प्रयत्न केला जातोय, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
काय म्हणाले संसदीय कामकाज मंत्री?
खासदारांवर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईबाबत बोलताना संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, ते सभागृहात फलक आणून देशातील जनतेचा अपमान करत आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील पराभवानंतर ते निराश झाले आहेत. त्यांचं वर्तन असंच सुरू राहिलं तर पुढील निवडणुकीनंतर ते परत येणार नाहीत. ते सभागृहात येणार नाहीत, असं ठरले होतं. लोकसभा अध्यक्षांसमोर हा निर्णय घेण्यात आला.