राज्यातील सरकार अदानींच्या दारी, करोनाशी लढलेली धारावी झुकणार नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मोर्चा धारावीत पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी धारावीच्या पुनर्विकासाचं काम अदानींना दिल्याच्या मुद्यावरुन हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंनी जमललेल्या धारावी, मुंबई आणि महाराष्ट्रप्रेमींचा धारावीसाठी संघर्ष सुरु आहे, असं म्हटलं. आज मुंबईतील मोजके कार्यकर्ते रस्त्यावर आलेलो आहोत. अदानींची दलाली घेतलीय त्या सुपारीबाजांना सांगतोय की हा आडकित्ता पाहा किती मोठा आहे. पन्नास खोके कमी पडायला लागली म्हणून धारावी आणि मुंबई गिळायला निघालेले आहेत, अशी टीका ठाकरेंनी केली. राज्यातील सरकार अदानीच्या दारी आहे. धारावीतील सर्व गोष्टींचा टीडीआर अदानींना देऊन टाकला आहे. सब भूमी अदानी की होऊ देणार नाही, असंही ठाकरे म्हणाले.
अडीच वर्ष यशस्वीपणे चालणारं सरकार गद्दारी करुन कुणी पाडलं हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. गुवाहाटीला जाण्यासाठी विमानं कुणी पुरवली असतील, हे लक्षात आलेलं असेल. उद्धव ठाकरे सत्तेवर आहेत तोपर्यंत मुंबई गिळता येणार हे लक्षात आल्यानं सरकार पाडलं की काय असं वाटू लागलंय, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
२०१८ चा विषय काढतात पण जे पाप असेल ते देवेंद्र फडणवीस यांचं असेल. धारावीत सरकारी कर्मचारी वसाहत होती.वांद्रे वसाहतीतील सरकारी कर्मचाऱ्यांना तिथल्या तिथं घरं देण्याचा निर्णय आमच्या सरकारनं घेतला होता. अदानींना धारावी, विमानतळ, नवी मुंबईतील विमानतळ, रेक्लेमेशन अदानींना दिलं जात आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
धारावीतील पात्र आणि अपात्र ठरवणारी पात्र कोणती आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. करोनाशी लढून जिंकणारी धारावी अदानीला शरण जाईल का? असा सवाल उद्धव ठाकरे म्हणाले. आता हे अपात्र आहेत त्यांना मिठागरात टाकणार म्हणजे तिथली जागा देखील अदानींना दिली जाईल. मिठागर पण अदानींना देऊन टाकताय का? असा सवाल ठाकरेंनी केला.
धारावीकरांना ५०० चौरस फुटाचं घर मिळालं पाहिजे. धारावीकरांना धारावीत घरं मिळाली पाहिजेत. धारावीचा विकास सरकारनं केला पाहिजे. अदानींना ज्या सवलती दिल्या त्या इतर कोणत्या बिल्डरला दिल्या आहेत, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
मुंबई महापालिकेच्या निवडणुका घेत नाहीत. विधानसभेत आम्ही सत्तेत आल्यानंतर अदानींचं काय करायचं ते बघून घेऊ, असं उद्धव ठाकरे म्हणाले. घराला घर दिल्याशिवाय धारावीकरांना धक्का लागता कामा नये. आज धारावीच्या लढ्याची सांगता नसून लढ्याची सुरुवात आहे. पोलिसांनी पण सरकार येतं आणि जातं याची देखील नोंद घ्यावी, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मी प्रकल्पाच्या विरोधात नाही, धारावीकर पिढ्यानं पिढ्या राहात आहेत तिथं अदानींनी एक दिवस राहून दाखवावं, असं आव्हान उद्धव ठाकरे म्हणाले.