शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या रिक्षा आणि ट्रकच्या अपघातामध्ये 8 चिमुकले जखमी झाले

आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथे एक धक्कादायक अपघात घडला आहे. शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या रिक्षा आणि ट्रकच्या अपघातामध्ये 8 चिमुकले जखमी झाले आहेत. या भीषण अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
नेमकं घडलं काय?
समोर आलेल्या माहितीनुसार, शाळकरी मुलांना नेणारी रिक्षा आणि ट्रकचा हा अपघात आज म्हणजेच 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजून 36 मिनिटांनी झाली. हा अपघात विशाखापट्टणममधील एका उड्डाणपुलाखालील चौकात झाला. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या दृष्यांमध्ये ट्रक उड्डाणपुलाखालील रस्त्यावरुन ट्रक येत असतानाच दुसऱ्या बाजूने भरधाव वेगात येणाऱ्या शाळकरी मुलांना घेऊन जात असलेल्या रिक्षाने ट्रकला धडक दिली. रिक्षा इतक्या वेगात होती की ट्रकला धडक दिल्यानंतर रिक्षामधली मुलं रस्त्यावर पडली.
मुलांची शुद्ध हरपली
अपघातानंतर रिक्षामधून बाहेर फेकल्या गेलेल्या काही मुलांची शुद्ध हरपल्याचंही व्हिडीओ पाहिल्यावर लक्षात येत आहे. अपघातानंतर काही वेळात आजूबाजूच्या लोकांनी रस्त्यावर बेशुद्धावस्तेत पडलेल्या मुलांना उचलून त्यांना मदत केल्याचं दिसत आहे.