देश

AkolaRaid: अकोला कथित धाडीवरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषिमंत्री सत्तारांची सर्वांसमोर ‘खरडपट्टी’; सत्तारांनी जोडले हात

गेल्या तीन चार दिवसांपासून अकोल्यात कृषी विभागाकडून करण्यात आलेल्या छापेमारेची राज्यात जोरदार चर्चा आहे. दरम्यान याच कथित धाडीवरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सर्वांसमोर ‘खरडपट्टी’ काढली आहे. अशा घटनांमुळे सरकारची प्रतिमा खराब होत असून, यापुढे अशा घटना होऊ नयेत अशी समज देखील सत्तार यांना देण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांचा पारा पाहून सत्तारांनी हात जोडले असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वी अकोल्यात कृषी विभागाकडून बियाणे विक्रेत्यावर धाडी टाकण्यात आल्या होत्या. मात्र यावेळी कारवाईसाठी गेलेल्या पथकात काही खाजगी लोकांचा देखील समावेश होता. दरम्यान हा सर्व प्रकार ‘एबीपी माझा’ने समोर आणला होता. तर या सर्व प्रकरणाची मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. तसेच मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत सत्तार यांचे मुख्यमंत्री शिंदे यांनी कान टोचले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अकोल्यातील छापेमारीवेळी पथकात खाजगी लोकांचा समावेश कसा होता? असा सवाल सत्तार यांना विचारण्यात आला. तसेच यापुढील सर्व कारवाया कायदेशीर पद्धतीने झाल्या पाहिजेत. अशा घटनांनी सरकारची प्रतिमा मलीन होत असल्याचे म्हणत शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली.

मंगळवारी दुपारी दोन वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्रिमंडळाची बैठक संपली. दरम्यान त्यानंतर मंत्रिमंडळात अनौपचारिक चर्चा सुरु असताना अकोला छापेमारी प्रकरणावर देखील चर्चा झाली. तर हा सर्व प्रकार गंभीर विषय असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर याचवेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सत्तार, तुमचे जे चालले आहे, ते वाईट आहे. तुम्ही कारभार सुधारा, असा बेबंदपणा बरा नाही. तर तुम्ही सरकारची पत धुळीला मिळवताय, या शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी सत्तारांना झापले, असल्याचे वृत्त दिव्य मराठीने दिले आहे.

सत्तारांकडून सारवासारवी…
अकोल्यातील प्रकरणावरून शिंदे-फडणवीस सरकारवर मोठ्याप्रमाणावर टीका होत आहे. सोबतच कारवाई साठी आलेल्या पथकाने पाच लाखांची खंडणी मागितली असल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणावर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नाराजी व्यक्त करत सत्तार यांचे कान टोचले. पण याचवेळी सत्तार यांनी सारवासारवी करत तेलंगणाचे उदाहरण देण्याचा प्रयत्न केला. बोगस बियाणे व खते विक्रीला चाप लावण्यासाठी आपल्याकडे कठोर कायदे नाहीत. तेलंगणात यासाठी विशेष कायदे असून, त्याप्रमाणे आपण देखील कायदा केला पाहिजे असं सत्तार म्हणाले. पण सत्तार यांची सारवासारव मुख्यमंत्री ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते असेही बोलले जात आहे.

Related Articles

Back to top button