Ajit Pawar: करोना महामारी अजून संपलेली नाही; तिसऱ्या लाटेबाबत अजित पवार म्हणाले…

करोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविली आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेत आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यावर सरकारचा भर आहे, असे नमूद करताना ऑक्सिजन क्षमतेत वाढ करण्यासोबतच जिल्ह्याने ऑक्सिजनबाबत स्वंयपूर्ण व्हावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. महानगरासोबतच ग्रामीण भागातील उपचार सुविधा सुसज्ज ठेवण्याच्या सूचनाही अजित पवार यांनी यंत्रणेला यावेळी दिल्या. ( Ajit Pawar On Covid 19 Third Wave )
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील करोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी अजित पवार यांनी अनेक महत्त्वाच्या सूचना केल्या. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवण्यासोबतच ऑक्सिजनप्रणाली, व्हेंटिलेटर्स, आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्धता आदी सुविधांच्या उपलब्धतेबाबत प्रशासनाने अधिक दक्ष राहण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना तात्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी, असे सांगताना ग्रामीण आरोग्य यंत्रणेचे सर्व सुविधांयुक्त बळकटीकरणास प्रथम प्राधान्य देण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
पोलीस प्रशासनाने वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश देत अजित पवार यांनी कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. आताही संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने ठिकठिकाणी ऑक्सिजन प्लान्टच्या निर्मितीसह स्वतंत्र रुग्णालये, लहान मुलांसाठी स्वतंत्र उपचार व्यवस्था आदी विविध आरोग्य सुविधा उभारण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे, सर्वेक्षण, संपर्क व समन्वयाची साखळी अखंडित राखण्याचे निर्देश दिले आहेत. करोनाची साथ अजूनही संपलेली नाही, हे प्रत्येकाने लक्षात घेणे आवश्यक आहे. केंद्र शासनाकडून लस पुरवठा मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर जिल्ह्यात रोज दीड लाख नागरिकांचे लसीकरण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.