देश

सावधान! 15,490 रुपयांच्या Income Tax Returns साठी पात्र ठरल्याचा SMS आला तर…

आयकर परताव्याची शेवटची तारीख म्हणजे 31 जुलैची डेडलाइन उलटून गेली आहे. आता अनेकांना आयकर परतावा मिळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र याचा फायदा काही सायबर गुन्हेगार घेत असून लोकांची फसवणूक करत आहेत. एका फेक मेसेजच्या माध्यमातून आयकर परताव्याच्या नावाखाली लोकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. अनेक करदात्यांना तुम्ही 15490 रुपयांचा आयकर परतावा मिळण्यासाठी पात्र असल्याचे खोटे मेसेज आले आहेत. या मेसेजबरोबर आलेल्या लिंकवर क्लिक केल्यास आर्थिक फटका बसू शकतो.

15490 रुपये मिळणार असा मेसेज
तुमचं अकाऊंट व्हेरिफाय करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा असं या मेसेजमध्ये सांगण्यात आलं आहे. या लिंकवर क्लिक केल्यास इन्कम टॅक्सच्या वेबसाईट प्रमाणेच दिसणाऱ्या खोट्या वेबसाईटवर युझर्सला रिडायरेक्ट केलं जातं. या वेबसाईटवरुन संबंधित युझर्सची पार्सनल माहिती चोरली जाते. ‘तुम्हाला आयकर परतावा म्हणून 15490 रुपये मिळणार आहेत. हे तुमच्या खात्यावर थोड्याच वेळात जमा केले जातील. तुम्ही तुमचा खाते क्रमांक XXXXXX व्हेरिफाय करुन घ्या. हा क्रमांक अयोग्य असेल तर तुम्ही तुमच्या बँक खात्याची माहिती खालील लिंकवर अपडेट करु शकता,’ असं या खोट्या मेसेजमध्ये सांगितलं जातं.

सावध राहा
यासंदर्भात सायबर तज्ज्ञ रितेश भाटीया यांनी, “इन्कम टॅक्स रिटर्न्सच्या फायलिंगच्या वेळेस अधिक जागृक राहण्याची आवश्यकता असते. अनेकदा फसवणूक करणारे सायबर गुन्हेगार ईमेल्स आणि टेक्स मेसेजच्या माध्यमातून आयकर परतव्याच्या नावाखाली फसवणूक करतात. आयकर विभागाकडून परतावा देण्यासाठी कधीच अशी माहिती देण्यासंदर्भात करदात्यांना विनंती केली जात नाही. तुम्हाला असा मेसेज आला आणि शंका असेल तर तुमच्या चार्ट्ड अकाऊंटंट किंवा आयकर विभागाच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपूर्क साधावा,” असा सल्ला ‘फर्स्ट पोस्ट जर्नल’शी बोलताना दिला आहे. इन्कम टॅक्सच्या नावाने येणारे फेक मेसेज कसा असतो तुम्हीच पाहा…

Related Articles

Back to top button