Maharashtra Rain Live Updates : मुंबईसह रायगडमध्ये पावसाचा जोर धडकी भरवतोय; घराबाहेर पडण्याआधीच सावध व्हा!

मुंबईसह कोकण विभागात गुरुवारी दुपारी 12 वाजल्यापासून मुसळधार पावसाची सुरुवात झाली. सकाळच्या वेळी शहरात पावसानं उसंत घेतल्यामुळं नोकरीसाठी अनेकजण घराबाहेर पडले. पण, त्यानंतर मात्र काळ्या ढगांची चादर शहराला झाकोळून गेली आणि पुन्हा एकदा शहरात पावसाला सुरुवात झाली. तिथं कोकणातही अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यात काही ठिकाणी पावसाचा वाढणारा जोर पाहता वाहतुकीचे मार्ग बदण्यात आले असून, मुंबई लोकल वाहतूकही 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरु आहे.
सायन रोड नं.24 येथे पावसाचे पाणी भरल्याने सायन सर्कल ते सायन स्टेशन सिग्नल दरम्यान नियोजित मार्ग बंद करुन राणी लक्ष्मीबाई चौक, रोड नं.3 मार्गे बसमार्ग 7,22,25,167,302,212,341,411,463 च्या बसगाड्या वेळ 13.35 पासुन परावर्तित करण्यात आलेल्या आहेत.
मुंबई शहर व उपनगरात जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अधूनमधून ४५ ते ५५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. समुद्रातील भरतीच्या वेळा दुपारी – 2.27 वाजता असून, 4.21 मीटरच्या लाटा उसळणार आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस, अहेरी परिसराला पावसाचा मोठा फटका बसला आहे.
पंढरपूर- भोर- महाड राष्ट्रीय महामार्गवरील वरंधा घाट रस्ता 22 जुलै ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत अवजड वाहतुकीकरीता बंद करण्यात आला आहे. रेड किंवा ऑरेंज अलर्ट असल्यानंतर संपूर्ण वाहतु त्या दिवसांपूर्ती बंद असणार आहे. तर घाटातील धोकादायक ठिकाणी असलेले दुकाने आणि हॉटेल स्थलांतरित करण्याचे आदेश ही देण्यात आले आहेत.
मुंबई, पुणे, ठाणे, रायगडसह राज्याच्या घाटमाथ्यावरील भागात पुढील तीन- चार तास धोक्याचे. पावसाच्या धारा अतीप्रचंड ताकदीनं बरसणार, समुद्रालाही उधाण
नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसल्यामुळं अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. हदगाव तालुक्यात तुफान पाऊस झाल्यामुळे सगळीकडे जलमय परिस्थिती निर्माण झाली होती. अनेकांच्या घरात पाणी शिरलंय. हदगाव ते नांदेड महामार्गावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली. महामार्गाला नदीचे रूप आल्याने नांदेड हदगाव संपर्क काही काळ तुटला होता
चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे वाशिष्ठी आणि शिव नदीला पूर आला होता. या पुराच्या पाण्याबरोबर शहरात अनेक ठिकाणी मगरी आढळून आल्या. जुना बाजार पुलावरही अशीच एक मगर आढळली. मात्र एका व्यक्तीनं या मगरीला स्वतःच दोरीनं बांधून फिरवल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. खरं म्हणजे वन्यजीव दिसताच वनविभागाला कळवलं जातं मात्र इथं तसं न करता स्वतःचा जीव धोक्यात टाकत मगरीलाही अमानुषपणे बांधण्यामागचं प्रयोजन काय असा सवाल विचारला जातोय.
रायगडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. नदी नाल्या तुडुंब भरून वाहू लागल्यात. पाली आणि नागोठणे शहरातील रस्ते पाण्याखाली गेलेत. इथले बसस्थानकांना तळ्याचं स्वरुप आलंय. सततच्या दमदार पावसामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. दुसरीकडं पुराची शक्यता लक्षात घेऊन NDRFचं पथक सज्ज झालंय.
मुसळधार पावसामुळं रायगडमध्ये अंबा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पाली- खोपोली राज्य महामार्गावर पाली जवळच्या आंबा नदी पुलाला पुराचा वेढा पडलाय. पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळं वाकण पाली खोपोली मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. विद्यार्थी, नागरिक आणि प्रवासी पुलाच्या दुतर्फा अडकले असून, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मुंबई गोवा आणि मुंबई पुणे द्रुतगती मार्ग या महत्वाच्या मार्गांना जोडणारा मार्ग बंद झालाय.
वसई विरारमध्ये गेल्या 72 तासांपासून दमदार पाऊस बसरतोय. पावसामुळे शहरी भागासह ग्रामीण भाग पूर्णपणे पाण्याखाली गेलाय. 72 तास उलटले मात्र तरीही पाण्याचा निचरा झालेला नाही. यामुळे नागरिकांना पाण्यातूनच आपली वाट काढत जाव लागतंय. विरार पश्चिमेच्या आगाशी-बोळींज रस्ता, विवा कॉलेज परिसर, म्हाडा वसाहत तर नालासोपा-यातील सेंट्रल पार्कसह अनेक भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय.
मुंबईत मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे बंद करण्यात आलाय. अंधेरी सबवेमध्ये पाणी साचल्यानं वाहतुकीसाठी सबवे बंद करण्यात आला.