भूमिकेसाठी केसांवरून फिरवलेला वस्तरा; या अभिनेत्रीला ओळखलंत का? आता झळकतेय कलर्सवरील मालिकेत

छोट्या पडद्यावर एखादा कलाकार झळकला की तो प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतो. तो कलाकार प्रेक्षकांच्या घरातला एक होऊन जातो. मात्र आता हिंदीप्रमाणे मराठी ओटीटीवरही अनेक दर्जेदार चित्रपट आणि वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अशाच एका गाजलेल्या सीरीजमधील एका अभिनेत्रीची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. ही अभिनेत्री सध्या तिच्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. मात्र या अभिनेत्रीने आधी साकारलेल्या भूमिकेत तिला कुणीही ओळखू शकलेलं नाही. ही अभिनेत्री सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील एका कार्यक्रमात झळकतेय. मात्र तिने वेबसीरिजमधील भूमिकेसाठी चक्क केसांवरून वस्तरा फिरवला होता. तुम्ही ओळखलंय का या अभिनेत्रीला?
मराठी कलाविश्वात प्रचंड गाजणारी वेबसीरिज म्हणजे ‘अथांग’. तेजस्विनी पंडित निर्मित ‘अथांग’ या वेबसीरिजमध्ये या अभिनेत्रीने निवेदिता सराफ यांच्या तरुणपणीची भूमिका साकारली होती. या सीरिजमध्ये रुक्मिणी हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीनं सर्वांचं लक्ष वेधलं. एका सीनमध्ये ती स्व: संरक्षणासाठी स्वत:च्या हातानं वस्तरा घेऊन आपले काळे भोर लांब सडक केस कापते. सीरिजमधील हा भाग अंगावर रोमांच आणणारा होता.
ही अभिनेत्री सध्या लोकप्रिय मराठी मालिकेत काम करतेय आणि ज्या मालिकेत ती काम करतेय तिथे तिच्या लग्नाचा ट्रॅक सुरू आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे रसिका वखारकर. रसिकाने ‘अथांग’मध्ये दमदार पात्र साकारत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आता ती मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकते आहे. रसिक सध्या ‘पिरतीचा वणवा उरी पेटला. या मालिकेत काम करताना दिसतेय.
रसिका मालिकेत सावीच्या भूमिकेत दिसतेय. सध्या मालिकेत तिचं आणि अर्जुनचं लग्न सुरू आहे. रसिका यापूर्वी ‘गाथा नवनाथांची’ या मालिकेतील कथेत ‘राणी रेवती’च्या भूमिकेत दिसली होती.